दीपक मोहिते,
निवडणूक संग्राम,
पालघर विधानसभा ; गावित – दुबळा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत,
१३० पालघर विधानसभा मतदारसंघात चार प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत.अनु .जमातीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात राजेंद्र गावित शिवसेना ( शिंदे गट ) व जयेंद्र दुबळा शिवसेना ( उबाठा ) या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पालघरवासियांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे.त्याचा फायदा त्यांच्या पक्षाच्या जयेंद्र दुबळा यांना होण्याची दाट शक्यता आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.पक्षात फूट पडल्यानंतर सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले.त्यामध्ये पालघर नगरपरिषद,पालघर पंचायत समिती,पालघर जिल्हा परिषदेचे अनेक सदस्यांचा समावेश होता.गेल्या पाच वर्षात राजेंद्र गावित यांनी भाजप,शिवसेना,भाजप व आता शिवसेना ( शिंदे गट ) असा वेडावाकडा राजकीय प्रवास केल्यामुळे येथील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते.त्यावेळी त्यांना विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.पण पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई,नालासोपारा,डहाणू व विक्रमगड हे चार मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांना पालघरमधून उमेदवारी देण्यासंदर्भात पेचप्रसंग निर्माण झाला होता.त्यामुळे राजेंद्र गावित व विलास तरे या दोघांना शिवसेनेतून ( शिंदे गट ) उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला.
पालघर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून आजही हा तालुका विकासाच्या बाबतीत मागासलेलाच आहे.राजेंद्र गावित हे २००९ ते २०१४ दरम्यान पाच वर्षे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते,पण ते विकासाची गंगा आणू शकले नाहीत.त्यानंतर दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले,पण त्यांची ही कारकीर्द देखील प्रभावी ठरू शकली नाही.पालघर विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असून गेली अनेक वर्षे समाजाचे अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित आहेत,त्यामध्ये आदिवासी समाजासाठी असलेल्या वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,कुपोषण,
अन्नधान्य पुरवठा,वैद्यकीय सेवा,रोजगार निर्मिती,उद्योगधंदे वाढ व पायाभूत सुविधा इ.समस्यांचा समावेश आहे.गेल्या २५ वर्षात त्या सोडवण्याच्या दृष्टीने कोणीही प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे राजेंद्र गावित यांना पुन्हा संधी मिळेल,हे सांगणे कठीण आहे.,दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा यांचे सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम आहे.तसेच शिवसेना फुटीनंतर त्यांना अनेक आमिषे दाखवण्यात आली,पण ते उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिले.त्याची पोचपावती म्हणून त्याना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.ते नवखे असेल तरी या निवडणुकीत गावित यांना प्रखर लढत देतील,असा अंदाज सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

