दीपक मोहिते,
निवडणुकीच्या जीवघेण्या खेळामध्ये शेतकरी/कष्टकरी दुर्लक्षित,
” सूर्यातीर,”
राज्यात सध्या सुरू असलेल्या
निवडणुकीच्या धामधुमीत आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला कोणालाही वेळ नाही.ग्रामीण भागातील आमचा हा कष्टकरी अन्नदाता,सध्या अडचणीत सापडला आहे.पिकाची नुकसानी व जगण्याची धडपड,अशा कात्रीत सापडला आहे.दुसरीकडे आलिशान गाड्यातून फिरणारे राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत वावरत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या हातात आली पाहिजे,यासाठी या मंडळींची कटकारस्थाने सुरू आहेत.प्रचारात उमेदवार व त्यांचे नेते अवकाळी पाऊस,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,शेतमालाला हमी भाव,पिकाची पाहणी,पंचनामे,अहवाल व त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया,यास मूठमाती देऊन ही मंडळी एकमेकाची बदनामी करण्याच्या खेळात मग्न आहेत.पावसाळ्याच्या मध्यात अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी व परतीच्या पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले.पण एकाही पक्षाला या ज्वलंत प्रश्नाची दखल घ्यावी असे वाटले नाही.मते मागण्यासाठी शेतकऱ्याच्या उंबरठ्यावर जाणारे,आज शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन मदत देऊ असे जाहीर करत
असतात.पण त्या शेतकऱ्यांकडे कोणीही ढुंकून बघायला तयार नाहीत.पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या या राज्यात अस घडावं,हे केवळ लांच्छनास्पद नाही तर तो राज्यकर्त्यांचा करंटेपणा आहे.८० टक्के राज्यकर्ते,ही शेतकऱ्यांची मुले आहेत,असे असतानाही ती आपल्या शेतात राब राबणाऱ्या आपल्या बापालाच विसरले आहेत.कर्जमाफी,
आत्महत्या,या दोन प्रश्नांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी अधिक अपेक्षा करू नये.जीवन-मरणाची ही लढाई असून ती तुम्हाला स्वतःलाच लढावी लागणार आहे.” मड्याच्या टाळूवरील लोणी,” खाणारी ही जमात आहे,त्यांच्याकडून अपेक्षा करणे,म्हणजे स्वतःचा कपाळमोक्ष करुन घेण्यासारखे आहे.आज एसटी कामगारांची परिस्थितीही शेतकऱ्यांसारखी झाली आहे.गेल्या काही वर्षापासून त्यांचे वेतन वेळेवर दिले जात नाही. शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे.लोकशाही व्यवस्था,ही सर्वसामान्य जनांच्या हितासाठी राबवली जाते,किंबहुना तो संविधानांनाने आपल्याला दिलेला हक्क आहे.पण आज सत्तेच्या साठमारीमध्ये कष्टकरी जनता होरपळून निघत आहे.सत्ता ही रयतेच्या भल्यासाठी राबवण्यात येते,असे आपण ऐकून होतो,पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आला नाही.निवडणूक जिंकण्यासाठी सरकार लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रू.वाटप करत सुटले आहे.स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या पैश्याची उधळपट्टी करणाऱ्या शिंदे सरकारला या निवडणुकीत जबर पराभवाला सामोरे जावे लागणार.

