दीपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
महायुतीच्या नेत्यांना सध्या भितीने ग्रासले आहे…
विधानसभा निवडणूकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.२३ नोव्हे.रोजी कसा निकाल लागेल ? याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.महाराष्ट्र राज्य ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर मुंबई शहर देशाची तिजोरी असून त्याच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात,यासाठी सध्या हा रणसंग्राम सुरू आहे.२० नोव्हें.२०२४ रोजी राज्यातील ९ कोटी जनता आपले २८८ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.
पूर्वी देश व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असायची,पण १९७७ सालापासून विविध पक्षाने एकत्र येऊन युती व आघाड्या स्थापन केल्या.
१९४७ ते १९७७ पर्यंत एकाच पक्षाच्या हाती सत्ता होती.१९७७ साली काँग्रेसचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक पक्षाचे कडबोळं सरकार सत्तेत आले.पण ते सरकार फार काळ टिकलं नाही.भाजपच्या दुहेरी सदस्यत्वावरून जनता पक्ष फुटला व काँग्रेस पुन्हा सत्तेत विराजमान झाली.इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी,नरसिंह राव यांनी देशाला स्थिर सरकारे दिली,पण दरम्यान देशवासीयांची मानसिकता बदलत गेली.त्यामुळे ” एका पक्षाचे सरकार,” ही मूळ संकल्पना भूतकाळात जमा झाली.त्यानंतर विश्वनाथ प्रतापसिंह,इंद्रकुमार गुजराल,चंद्रशेखर,एच.डी.
देवेगौडा,अटलबिहारी वाजपेयी यांची सरकारे आली,पण त्यांना ती सलग पाच वर्षे टिकवता आली नाहीत.१९९८ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले.या सर्व घडामोडीनंतर गठबंधन ही संकल्पना अस्तित्वात आली,ती आजतागायत.. केंद्रात रालोआ व संपुआ गठबंधने जन्माला आले.त्याचवेळी राज्यातही राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.१९८९ मध्ये भाजप व शिवसेना युती आकाराला आली.पण या युतीला सत्तेसाठी तब्बल सहा वर्षे प्रतिक्षा करावी लागली.त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस सरकार विरोधात रान उठवले व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्या व राज्यात प्रथमच बिगरकाँग्रेसी सरकार सत्तेत आले.येथूनच राज्यात युती व आघाड्या होण्यास सुरुवात झाली.१९९९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन आघाडी सरकार बनवले.या आघाडी सरकारने सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगली.दरम्यान भाजप – सेना युतीने २०१२ पासून केंद्र व राज्यात संपुआ व आघाडी विरोधात जबरदस्त मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती.त्यास प्रचंड यश मिळाले.२०१४ साली केंद्र व राज्यात परिवर्तन घडून आले.मात्र त्याचवेळी युतीमध्ये कुरबुरी पण सुरू झाल्या होत्या.युती सरकारचा गाडा कसाबसा अडखळत,धडपडत चालला होता.२०१४ साली युतीमधील दोन्ही पक्ष वेगवेगळे
लढले,पण एकहाती सत्ता मिळवण्यात दोघेही अपयशी ठरले.हातून सत्ता जाण्याची शक्यता लक्षात घेऊन हे दोघे पुन्हा एकत्र आले.२०१९ साली त्यांना पुन्हा सत्ता मिळाली,पण मुख्यमंत्रिपदावरून त्यांचे बिनसले व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी एकत्र येवून महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग राबवला.भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल,याविषयी सर्वत्र साशंकता निर्माण झाली होती,पण राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी महाविकास आघाडीची कमान यशस्वीरीत्या सांभाळली.दुसरीकडे हातातोंडाशी आलेला घास उद्धव ठाकरे यांच्यामुळे गमावल्याची सल भाजपच्या नेत्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यानंतर घडलेला इतिहास हा ताजाच असल्यामुळे त्या घडामोडींचे पुन्हा सविस्तर विवेचन करण्याची गरज नाही.शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची आर्थिक लफडी बाहेर काढून भाजपने त्याना इडीची भिती दाखवून आपापले पक्ष सोडण्यास भाग पाडले.ज्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वासू सहकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या सोपवल्या, या त्या एकनाथ शिंदे यांनी आपल्याला अटक होईल,या भितीतून उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले.त्यानंतर अजित पवार यांनीही आपण जर भाजपसोबत गेलो नाही तर जेलची हवा खाणे,आपल्याही नशिबी येऊ शकते,हे लक्षात घेवून त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली व वेगळी चूल मांडली.राज्याच्या राजकारणातील एक दुष्ट पर्व अशाप्रकारे सुरू झाले.आता २०२४ साली जी रणधुमाळी सुरू आहे,त्यामध्ये शरद पवार व उद्धव ठाकरे या दोघांनी महायुतीला सळो कि पळो,करून सोडले आहे.ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून महायुतीच्या नेत्यांना लोकसभा निवडणूकीची पुनरावृत्ती होते की काय ? अशा भितीने सध्या ग्रासले आहे.

