दीपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
रात्रीच्या वेळी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होणे गरजेचे,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आजपासून जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात पैशाचा ओघ सुरू झाला आहे.स्थानिक पोलिसांनी तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करून कोट्यवधी रु.जप्त केले आहेत.त्या पार्श्वभूमीवर वसई – विरार पोलीस आयुक्तालयाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.काल रात्री प्रचार संपल्यानंतर अनेक वाहने परिसरात फिरत होती,ती वाहने कोणत्या पक्षाची होती,त्याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.केवळ चौकाचौकात महिला पोलिसांना बसवून मतदारसंघात होणारी पैशाचे आवागमन रोखणे कदापी शक्य होणार नाही.निवडणूक अधिकारी व पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन हाती घेणे अनिवार्य आहे.
मतदानाला अवघे ७२ तास उरले असून निवडणूक व पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.सध्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून १८ तारखेला सायंकाळी ५.०० वाजता बंद होणार आहे.अखेरच्या ७२ तासात पैश्याचा ओघ सुरु होण्याची शक्यता आहे.विरार पूर्व भागातील शिरसाड,विरार फाटा,कारगिल नगर,नाना नानी पार्क,मनवेलपाडा,फुलपाडा,नालासोपारा येथे नालासोपारा फाटा,संतोष भुवन, धानिव,धानिवबाग,पेल्हार, वसई येथे सातिवली,वालिव, चिंचोटी,पश्चिम भागात भुईगाव डोंगरी,कळंब नवापूर, राजोडी व नायगांव येथे बाफाणे,चंद्रेपाडा,उमेळा या सर्व गावात निवडणूक अधिकारी व पोलिसांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी झाली पाहिजे.दर निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष ” रात्रीचा खेळ चाले,” नाट्य रंगवत असतात.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगोलग पोलिसांनी विरार,वसई व नालासोपारा परिसरात कोट्यवधी रु.जप्त केले होते.हा अनुभव गाठीशी असताना पोलिसांनी गाफील राहता कामा नये.तसेच एका संघटनेचे शेजारच्या राज्यातील सुमारे तीनशे ते चारशे लोक नालासोपारा शहरात आले असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.हे लोक हॉटेलमध्ये मुक्कामाला नसून एका पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी असतात.ते येथे कशासाठी आले आहेत व काय काम करत आहेत,याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे.

