दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजप खासदारांकडून ” घरचा आहेर,”
सूर्याला कितीही लपवून ठेवलं तरी सकाळ व्हायची टळत नाही,अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली.काल राज्यसभा खा.सीमा द्विवेदी या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नालासोपारा शहरात आल्या होत्या.त्यांनी या मतदारसंघात झालेल्या विकासाबाबत माध्यमाकडे आपले मतप्रदर्शन केले.त्या म्हणाल्या,” मी प्रत्येक निवडणुकीत नालासोपारा येथे येत असते.गेल्या काही वर्षात या परिसराचा मोठ्याप्रमाणात विकास झाला आहे.रस्ते पाणी,भवन या साऱ्या समस्या सुटल्या असून पूर्वीच्या तुलनेत भरपूर विकास झाला आहे.माध्यमांशी त्या बोलत असताना त्यांच्यासोबत असलेले भाजपचे उमेदवार राजन नाईक यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.
बाहेरून येणाऱ्या प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांना या परिसरातील विकासकामे पाहून कौतुक वाटते.पण स्थानिक पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांना तो दिसत नाही.हे खऱ्या अर्थाने वसई व नालासोपारा शहरातील जनतेचे दुर्दैव आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते हे सतत शरद पवार,उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्यावर ” फेक नरेटिव्ह,” पसरवण्याचा आरोप करत असतात.पण ” फेक नरेटिव्ह,” कोण पसरवतात,हे सीमा द्विवेदी यांनी काल उघड केले आहे.वसई – विरार परिसरात विरोधी पक्ष गेली तीन दशके ही मंडळी हाच प्रकार करत आले आहेत.वास्तविक विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर टीका करायला हवी,पण ती सकारात्मक अशी असायला हवी.त्यांनी आपल्या प्रचारात विकासावर बोलायला हवे.आपल्या उपप्रदेशाच्या विकासकामांना आर्थिक निधी देताना आपले सरकार,या उपप्रदेशाला सावत्रपणाची वागणूक देते.आज आपल्या महानगरपालिकेला अनुदाने देताना अडथळे निर्माण करणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? यावर त्यांनी बोलायला हवे,ते न करता विरोधाला विरोध करणे,सुरू असलेल्या विकासकामात अडथळे आणणे,इ.प्रकार आजवर झालेल्या त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरत आले आहेत.काल त्यांच्या खा.सीमा द्विवेदी यांनी झालेल्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले.त्यामुळे आता विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.

