दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
स्थानिक उमेदवाराची नाळ मातीशी जुळलेली असते..
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे चार दिवस उरले आहेत.त्यामुळे या चार दिवसात जाहीर सभांना उत येणार आहे.प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राष्ट्रीय नेत्यांना या जाहीर सभांसाठी पाचारण करणार आहेत.बाहेरच्या नेत्यांना पाचारण करून मतदार आपल्याकडे वळतील,अशी अपेक्षा करणे,मुळात चुकीचे आहे.लोक जाहीर सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावतात,पण ते नेत्यांची भाषणे ऐकून आपली मते देत नसतात.जाहीर सभेला येणारी मंडळी केवळ भाषणे ऐकायला येत असतात.पण आपले मत कोणाला द्यायचे हे मनात पक्के ठरवून असतात.जो उमेदवार परिसर विकासाला सर्वोच्च प्राधान्य देतो,मतदार त्यालाच डोक्यावर घेत असतात.तीन दशकांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वसईमध्ये भूतो न भविष्यती,अशी जाहीर सभा झाली होती.त्यावेळी शिवसैनिकांचा आवेश बघण्यासारखा होता,प्रत्येक शिवसैनिक विजय आमचाच असे छाती ठोकून बोलत होता.पण मतपेटी उघडल्यानंतर जे काही घडलं ते पाहून शिवसैनिक अक्षरशः आक्रोश करायला लागले.कारण आ.हितेंद्र ठाकूर यांनी स्वत:च्या ताकदीवर एकहाती विजय खेचून आणला होता.१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत डहाणू लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे स्व.चिंतामण वनगा रिंगणात उतरले होते,त्यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना जव्हार येथे आयोजित जाहीर सभेला पाचारण करण्यात आले होते.या जाहीर सभेला ग्रामीण जनतेचा सागर लोटला होता.पण त्याही निवडणुकीत भाजपच्या वनगा यांना पराभव चाखावा लागला.त्यामुळे बाहेरून आलेले नेते विजय खेचून आणू शकत नाहीत,हे ,वारंवार सिद्ध झाले आहे.गेल्या नालासोपारा विधानसभा निवडणुकीतही बाहेरच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली,पण आ.क्षितिज ठाकूर यांनी त्यांना पाणी पाजले.यंदाही भाजप अनेक नेत्यांना पाचारण करण्याच्या तयारीत आहे,पण या निवडणुकीतही इतिहासाची पुनरावृत्ती होईल,कारण स्थानिक उमेदवारांची नाळ ही त्या मातीशी जुळलेली असते.राज ठाकरे यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड गर्दी होत असते,पण या गर्दीचे रूपांतर आजवर कधीही मतामध्ये होऊ शकले नाही.

