दीपक मोहिते,
वसई व नालासोपारा ; शरद पवार यांचा कल बविआला पाठिंबा देण्याकडे….
आ.हितेंद्र ठाकूर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांमध्ये नुकताच झालेल्या संवादामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भुवया वर झाल्या आहेत.जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण तयार होण्याच्या शक्यतेमुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये धडकी भरली आहे.आ.हितेंद्र ठाकूर यांनी जिल्ह्यातील सहाही जागा आम्ही लढवत आहोत,अशी घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण आता वेगळ्या वळणावर आले आहे.महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.
वसई व नालासोपारा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद नगण्य असल्यामुळे या दोन्ही जागा महाविकास आघाडीने लढवू नये,असा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.याविषयी पवार हे उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहेत.जागावाटपात वसईची जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व नालासोपाऱ्याची शिवसेनेला ( उबाठा ) असे सूत्र ठरले आहे,पण विजयाची शक्यता नसल्यामुळे शरद पवार हे या दोन्ही जागा महाविकास आघाडीने न लढवता बहुजन विकास आघाडीला सोडाव्यात,अशा निष्कर्षाप्रत आले आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सत्तेत आलो तर बविआच्या तीन आमदारांचा आपल्याला बिनशर्त पाठिंबा आपल्याला मिळेल.आ.ठाकूर हे सत्तेत असलेल्या पक्षासोबत कायम असतात.त्यामुळे त्यांच्याविरोधात या दोन्ही जागा आपण लढवता कामा नये.याप्रश्नी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये आज किंवा उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.या दोन्ही मतदारसंघात सेना किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांना गेल्या तीस वर्षात एकदाही विजयी होता आले नाही.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही सेनेच्या भारती कामडी या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.त्यामुळे महाविकास आघाडीचे इतर ज्येष्ठ नेतेदेखील पवार यांच्या सुरात सूर मिळवतील,अशी शक्यता आहे.

