दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
२० नोव्हें.रोजी मतदान तर निकाल २३ नोव्हें रोजी,राजकीय हालचालींना वेग,
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.महाराष्ट्रात २० नोव्हे.रोजी मतदान होणार असून २३ नोव्हे.रोजी निकाल लागणार आहे.या निवडणुकीत सुमारे ९ कोटी ६३ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत.त्यापैकी ४ कोटी ९७ लाख पुरुष तर ४ कोटी ६६ लाख महिला मतदार आहेत.तसेच ५६ हजाराहून अधिक मतदार तृतीय पंथीय आहेत.या निवडणुकीत १ लाख १८६ मतदानकेंद्रे आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टो.रोजी प्रसिद्ध होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टो.अशी आहे.३० ऑक्टो.रोजी उमेदवारी अर्जाची छाननी असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हे.आहे.तर मतदान २० नोव्हे.व निवडणुकीचा निकाल २३ नोव्हे.रोजी लागणार आहे.
गेल्या विधानसभेत खालील प्रमाणे पक्षीय बलाबल होते.
भाजप-१०५,
शिवसेना-५६,
राष्ट्रवादी-५४,
काँग्रेस-४४,
बविआ-०३,
प्रहार-०२,
एमआयएम-०२,
समाजवादी पक्ष-०२,
मनसे-०१,
माकप-०१,
जनसुराज्य-०१,
क्रांतिकारी शेतकरी पक्ष-०१,
शेकाप-०१,
रासप-०१,
स्वाभिमानी-०१,
अपक्ष -१३,
एकूण जागा-२८८,
या विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या दोघांनीही जागावाटपाला अद्याप मूर्तस्वरूप दिलेले नाही.अनेक जागांवरून चांगलेच धुमशान रंगले आहे.लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे.

