दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे,गृहमंत्र्यांनी पायउतार व्हावे,
काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेने कायदा-सुव्यवस्थेसोबत सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खालावली असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबई,पुणे व नागपूर या तीन शहरात गुंडगिरीने जो हैदोस घातला आहे,तो पाहता या शहरात आता कोणीही सुरक्षित नाही,हे स्पष्ट झाले आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.जे गृहखाते एका माजी राज्यमंत्र्याचे संरक्षण करू शकत नाही,त्या खात्याच्या प्रमुखपदी असलेल्या फडणवीस यांनी पायउतार व्हायला हवे,अशा मागणीने जोर धरला आहे.
राज्याची राजधानी मुंबई,उपराजधानी नागपूर व सांस्कृतिक व सुशिक्षीत अशी ओळख असलेली ही तीन शहरे आता ज्वालामुखीच्या तोंडावर वसली आहेत.बलात्कार,हत्या,
लूटमार,दंगली,अपहरण इ.घटनांना राज्यात ऊत आला आहे.ज्या राज्याची ओळख सुशिक्षीत, उद्योगशील व पुरोगामी अशी होती,त्या राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे अडीच हजार हत्येच्या तर तीन हजारहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या.राज्यात बलात्काराच्या १०० घटनापैकी केवळ २१ घटनामधील आरोपींना शिक्षा होते.यावरून पोलीस यंत्रणेचा कारभार किती ढिसाळपणे सुरू आहे,हे आपल्या लक्षात येते.बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजने ( एसआरए ) च्या एका प्रकरणातील वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्या जीवाला धोका असल्याचे समजल्यानंतर त्यांना ” वाय,” दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.तरीही हल्लेखोर हत्या करण्यात यशस्वी ठरतात,यावरून काय निष्कर्ष काढायचा ?जेथे मंत्रीच असुरक्षित आहेत,सरकारला त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पेलता येत नाही,ते सरकार असून नसल्यासारखे आहे.त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन गृहमंत्री पदावरून पायउतार झालेच पाहिजे.

