दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट, ”
उशीरा का होईना, मुख्यमंत्री अखेर शेतीच्या बांधावर आले…
उशीरा का होईना, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व चर्चा केली.
कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विलंब न लावता आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली. पण सरकार याविषयीं चकार शब्द बोलायला तयार नव्हते. पण महायुतीमधील पक्षातील आमदारामध्ये याविषयी असलेली नाराजी लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस हे आज लातूर, धाराशिव व सोलापूर या तीन अतिगंभीर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ” आमच्याकडे आता काहीच शिल्लक उरले नाही, ” असा हंबरडा फोडला. फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना धीर दिला व एकूण पाच घोषणा केल्या.
१ ) येत्या तीन दिवसात दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार, यंदाचा दुष्काळ हा १९७२ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ असून चालू वर्षी केवळ ५० % च पाऊस झाल्याचे सांगितले.
२ ) शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार,
पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार होणार, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे मदतही सरसकट करू, राज्य इतर कोणाच्या माध्यमातून मदत करण्याऐवजी स्वतः थेट मदत करेल,
३ ) कॅबिनेट अधिकार असलेली उपसमिती स्थापन करणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या उपसमितीमध्ये गिरीश, महाजन, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील व मकरंद पाटील यांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले.
४ ) पाणी व चारा – ८ महिन्याचे नियोजन :
टँकर, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सूरू करणार,
५ ) मराठावाडा वॉटर ग्रीड पुन्हा सुरु करणार, कोल्हापूर – सांगलीच्या पुराचे पाणी उजनीत आणण्यासाठी प्रयत्न करणार,
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांना तोंडभरून आश्वासने दिली आहेत, मात्र त्याची प्रत्यक्षात किती अमलबजावणी होते, यावर सारे काही अवलंबून आहे.

