दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अहो आश्चर्यम… बाप्पा सुरक्षितपणे आले व जीव मुठीत धरून परतले…
गरीब बिच्चारे बाप्पा, कसे बसे,आले, व भक्तांना आनंद देऊन आल्या पावली जीव मुठीत धरून परतले. आता सार्वजनिक मंडळाचे गणपती ” पुढच्या वर्षी नक्की या, ” अशा जयघोषात निघतील. सुरुवातीला विरार, नालासोपारा, नवघर – माणिकपूर व वसई या चार महानगरातील रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून बाप्पाच्या काळजात धस्स झाले होते.
बाप्पाची अवस्था त्यावेळी सासरी निघालेल्या पण धास्तावलेल्या सुनेसारखी झाली होती, ” येऊ कसा मी नांदायला गो येऊ कसा मी नांदायला, ” असे गुणगुणत बाप्पा भक्ताच्या विनंतीला मान देऊन या चार महानगरात दाखल झाले व पाच दिवसाच्या वास्तव्यानंतर ते पुन्हा आता मार्गस्थ झाले आहेत. त्यांचे येणे व जाणे हे भक्तांसाठी एकप्रकारचे आव्हानच होते. पण भक्तांऐवजी हे आव्हान बाप्पाने स्वतः आपल्या शिंगावर घेतले. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे रिल्स बनवणे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे तलाव व पाहणीचे दौरे सुरूच होते. या अशा पाहणी दौऱ्यातून काहीही निष्पन्न होत नाही, हे त्या नेत्यांना व बाप्पाच्या भक्तांनाही माहित असते. पण नेत्यांचे अंधभक्त मात्र ” आधीच मर्कट, त्यात दारू प्यायलेला, ” अशा भूमिकेत येऊन टणाटण उड्या मारत होते. असो, बाप्पाच्या आशिर्वादामुळे गणेशोत्सव सुरळीत पार पडला. आता नवरात्र व दीपावली हे दोन्ही सण उंबरठ्यावर आले आहेत, तसेच पाऊस देखील ओसरला आहे.त्यामुळे पाहणी दौरे करणाऱ्या नेत्यांनी रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. डांबर टाकताना किंवा रोड रोलर्सचे बाजूला उभे राहून सेल्फी काढणारे फोटो पाहून नागरिकांना अक्षरशः वीट आला आहे.*नागरिकांना अपेक्षा आहे खड्डे विरहित रस्त्याच्या रिल्सची…. नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण होईल, अशी शक्यता फार कमी आहे. वाहतूकीस सुरक्षित रस्ते तयार झाले, तर भविष्यात आपली उपासमार होईल व आपण भिकेला लागू अशी भिती नेते, ठेकेदार व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत वाटत असते. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे म्हणजे आपले डोके खडकावर आपटून घेण्यासारखे आहे.

