दीपक मोहिते,
२०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य,
मी कालच दिल्लीवरून मुंबईला परतलो, दिल्लीच्या या भेटीत मी मंत्रालयाचे अनेक अधिकारी व एनजिओच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. तसेच महाराष्ट्रातील काही आमदार व खासदार यांचीही आवर्जून भेट घेतली. या भेटीत अनेक विषयावर चर्चा केली. त्यामध्ये समान नागरी कायदा, एसआयआर, जातीनिहाय जनगणना, धर्मांतरबंदी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन इ. विषयाचा समावेश होता. उत्तराखंड मागोमाग महाराष्ट्र सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचे या भेटी दरम्यान कळले. तसेच देशात मोठ्याप्रमाणात वगळण्यात आलेल्या मतदारसंदर्भात अनेक ज्येष्ठ विधीतज्ञानी आपली मते व्यक्त केली. दिल्लीतील राजकारण हे इतर राज्यातील राजकारणापेक्षा वेगळे असते. येथे खूप काही शिकायला मिळते. राजकीय वातावरणाची नक्की दिशा कशी आहे ? लोकांचा कल कोणत्या राजकीय पक्षाकडे आहे ? सत्ताधारी व विरोधी पक्षाची प्रतिमा जनमानसात कशी आहे ? महागाई, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरी, आरक्षण या सर्व ज्वलंत विषयी परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्ष आता एजन्सी नियुक्त करू लागले आहेत. या व्यवसायाला आता एकप्रकारे कॉपोरेट स्वरूप आले आहे. या अशा एजन्सीममध्ये हजारो तरुण काम करत असतात. या एजन्सी राज्याराज्यातील राजकीय घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवतात व दर तीन महिन्यांनी आपला अहवाल राजकीय पक्षाच्या पॉलिटिकल विंगला सादर करत असतात. अशा एजन्सीकडून आलेल्या अहवालावर राजकीय पक्षाकडून निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरत असते. नुकत्याच झालेल्या प. बंगालच्या निवडणुकीत भाजपने या स्ट्रॅटेजीवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धूळ चारली. महाराष्ट्रात एका राजकीय पक्षाने राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्याशी नुकतीच चर्चा केली. सदर बाब उघड होताच भाजपने त्या पक्षातील वरिष्ठ नेत्याकडे आपली नाराजी व्यक्त केली.

दिल्लीत जेंव्हा मी अशा अनेक एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेंव्हा त्यांनी २०३४ पर्यंत भाजपला हरवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार इंडिया गट हा आता पूर्ण पणे नामशेष झाला आहे. तो कधीच एकसंघ नव्हता,आता तर त्यांच्यामध्ये थेट दुफळी झाली आहे.आज या गटातील प्रत्येक राजकीय पक्षाला एकमेकांची साथसंगत नकोशी झाली आहे. त्यामुळे भाजपला आगामी दोन निवडणुकामध्ये धोका नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची बऱ्यापैकी पीछेहाट झाली होती. त्यांच्या पक्षाचे संख्याबळ बरेच खाली आले, पण मित्रपक्षाच्या साहाय्याने त्यांनी तिसऱ्यांदा सरकार बनवले. त्यामुळे भाजप सध्या खासदार फोडायच्या प्रयत्नात आहे. तृणमूल काँग्रेसचे अठरा व महाराष्ट्रात ठाकरे गटाचे सहा असे एकूण २४ खासदार त्यांनी गळाला लावले आहेत. लोकसभेसह राज्यसभेत बहुमत असावे, यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. गेल्या वेळी पुरेसे बहुमत नसल्यामुळे सरकारने आणलेली दोन विधेयके फेटाळली गेली. तो अनुभव लक्षात घेऊन त्यांनी पुढील रणनिती आखली आहे. पक्षाकडे नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोन मोहरे असल्यामुळे भाजपला आपली रणनिती आखणे कठीण नसते. त्यांच्या वरिष्ठ वर्तुळात अवती भवती असलेल्याना आपले मत व्यक्त करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे भाजपचे सर्व निर्णय हे एकमताने होत असतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येही हीच प्रथा आहे, पण काँग्रेस पक्षातील लोक हे सत्तेच्या हव्यासापोटी सतत दलबदलू होत असतात. राहुल गांधी हे पक्षाला उभारी मिळावी, म्हणून प्रचंड मेहनत करतात, पण त्यांना, सोबत असलेल्यांची साथ मिळत नाही. ग्राऊंड लेव्हलवर पक्षबांधणीला जोवर महत्व दिले जात नाही, तोवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुगीचे दिवस येणे कठीण आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालवला आहे, पण मोदी सरकार याविषयी चालढकल करत आहे. ही मागणी मान्य केल्यास विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी होईल, व ते भविष्यात त्रासदायक ठरू शकते, याची त्यांना जाणीव आहे. आगामी काळात पंजाब व इतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप एसआयआरच्या माध्यमातून मतदार वगळण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न करत आहे. धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासंदर्भातही भाजप हालचाली करत आहे. या अशा ज्वलंत विषयी त्यांना काही एजन्सीकडून मदत होत असते. भाजपकडे २०२९ च्या निवडणुकीसाठी पूर्ण डेटा तयार आहे.
राज्यात फडणवीस सरकारनेही २०३० च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या नकोत, म्हणून प्रयत्न चालवले आहेत. प. महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष खिळखिळे करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. त्याची कुणकुण लागल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार या दोघांनी प्रशांत किशोर यांना आपल्या निवासस्थानी पाचारण केले. या भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच दुखावले गेले व त्यांनी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांचे कान भरले व या दोघांनी प्रशांत किशोर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला कडाडून विरोध केला.

