दीपक मोहिते,
” या चिमण्यानो, परत फिरा रे,”
कोकणातील तरुण हे गावात रोजगार नसल्यामुळे आपापली गावे सोडून शहरी भागात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे कोकणातील गावेच्या गावे ओस पडत चालली आहेत. सणासुदीच्या काळात हे तरुण आपल्या बायका मुलासह गावी येत असतात. त्यांचा सात ते आठ दिवसाचा काळ हा त्यांच्या वृद्ध आई – वडीलासाठी सुवर्णंकाळ असतो. पण ही मुले जेव्हा परत निघतात, तेंव्हा आयुष्याची संध्याकाळ सुरु झालेल्या त्या आईवडिलांच्या जीवांची घालमेल पाहवत नाही. वर्षाचे ३५० दिवस एकाकी जीवन जगणाऱ्या त्या वृद्ध माता पित्याच्या चेहऱ्यावर ” आता जगणं बस झाले, ” असे भाव असतात. मनातल्या मनात ” चिमण्यानो परत फिरा रे, ” ही ओळ तरळत असते. मुलांना सोडायला घराच्या उंबऱ्यावर पाय लटपट ते निरोप देण्यासाठी उभे असतात. आजची ही एक अतिशय संवेदनशील आणि गंभीर वस्तुस्थिती आहे.
तरुण मंडळी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाली आहेत, तर गावातील वृद्ध आई-वडील अत्यंत एकाकी आणि विमनस्क (उदास) अवस्थेत दिवस काढत आहेत. हे केवळ एका घराचे दुःख नसून कोकणातील बहुतांश गावांची हीच कहाणी आहे. या समस्येचे विविध पैलू आणि त्यावरील काही व्यावहारिक उपाय खालीलप्रमाणे आहेत : वृद्धांच्या विमनस्क स्थितीची मुख्य कारणे म्हणजे एकाकीपणा आणि मानसिक ताण होय, गजबजलेल्या घरातून अचानक मुले निघून गेल्यावर येणारे रिकामेपण वृद्धांना मानसिकदृष्ट्या साफ पोखरुन टाकते. संवाद साधायला कोणी नसल्याने विमनस्कपणा वाढतो.आरोग्याची काळजी घेणारे कोणी नाही, वयपरत्वे येणारे आजारपण, डॉक्टरांकडे जाणे, औषधपाणी करणे, यासाठी कोणीतरी सोबत असणे गरजेचे असते, जे तेथे उपलब्ध नसते. ओस पडत चाललेल्या गावांमध्ये आणि मोठ्या कौलारू घरांमध्ये वृद्ध पती-पत्नीला रात्री-अपरात्री सुरक्षिततेची भिती सतावत असते. पण परिस्थितीवर उपाययोजना करणे, आता अशक्य आहे, पण, मुलांना आपली जबाबदारी ढकलता येणार नाही. त्यांनी दिवसातून किमान दोनदा तरी फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून पालकांशी संवाद साधावा. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपण एकटे नाही आहोत, अशी भावना निर्माण होईल. केवळ गणपती किंवा शिमग्यालाच ( होळी ) गावी न जाता, दोन-तीन महिन्यांतून एकदा पालकांना भेटायला जाण्याचे नियोजन करावे. गावातील एखादा विश्वासू तरुण, शेजारी किंवा नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत ते मदतीला धावून जाऊ शकतील. प्रत्येक गावात किंवा ४-५ गावे मिळून ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा किंवा संघ असावा. जेथे हे वृद्ध एकत्र येऊन भजन, गप्पागोष्टी किंवा वाचन करू शकतील. गावातील मंडळांनी किंवा ग्रामपंचायतीने वृद्धांच्या घरपोच आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष व्यवस्था करावी.
याहून अधिक म्हणजे सरकारने गावस्तरावर उद्योग, व्यापार व स्टार्टअप इ. रोजगार आधारित उपक्रम राबवावेत, जेणेकरून एकत्रित कुटुंबाच्या जीवावर उठलेले स्थलांतरण थांबून गावे खऱ्या अर्थाने समृद्ध होतील. ही केवळ एका घराची व्यथा नसून कोकणातील ओसाड बनत चाललेल्या प्रत्येक गावाची कहाणी आहे. आज सणासुदीला गावात आलेली पावले जेंव्हा माघारी फिरतात तेंव्हा घराच्या उंबऱ्यावर अश्रूचे पाट वाहत असतात. ही मुले व नातवंडे घरात खेळत बागडत असतात तेंव्हा घराच्या पडवीत बसलेल्या आजी आजोबांना पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटत असते. पण पुन्हा माघारी फिरताना जेंव्हा एसटी धुरळा उडवत वळणावर नाहीशी होते, तेव्हा त्या वृद्ध आई वडिलांच्या काळजात धस्स होत असते, त्या काळजातून अनायसे त्यांच्या ओठावर एक ओळ असते, या ” चिमण्यानो, परत फिरा रे, ” पण ती ओळ ऐकण्यासाठी समोर कोणी नसते…

