दीपक मोहिते,
आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता,
काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल ४० दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परवा रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. हा पाऊस, तयार झालेल्या भातपिकासाठी मारक ठरणार कि तारक ठरणार हे येत्या तीन दिवसात मुसळधार पाउस झाल्यास कळणार आहे. पण सध्या तरी शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड व रत्नागिरी या पाच जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तसेच दिवसभर ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहतील, विजाच्या कडकडाटासह जोरदार वृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी साचले आहे. विरार व नालासोपारा शहर, विरार फाटा, मनोर, बोईसर, पालघर – बोईसर, यादवनगर, रेल्वे ट्रॅक परिसर व सातपाटी मार्ग, या परिसरातील सखल भागात सर्वत्र पाणी साचले आहे. झाडे पडणे, वाहतूक विस्कळीत होणे, अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांनी घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज जर अतिवृष्टी झाली तर विरार, नालासोपारा व मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

