दीपक मोहिते,
समाजात इतकी असंवेदनशीलता येते तरी कुठून ?
देशाच्या राजधानीत जे काही घडलं ते माणुसकीला काळे फासणारे होते. तसेच
ते समाजाला सुन्न करणारे देखील आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत गेली जवळपास दोन दशके वास्तव्यास असलेला प्रख्यात मणिपुरी गिटारवादक चोंगथम विक्रम सिंह यांस आठ-दहा जणांनी ठेचून मारले. विक्रम सिंह यांचे वय ५४, शरीरानेही तसे ते कृशच. त्यांचे पाप इतकेच की मध्यरात्रीच्या सुमारास घराखाली गोंगाट करणार्या रिकामटेकड्याना ते ” शांत बसा, ” असे सांगायला गेले. अलीकडे एका मोठ्या बिनडोक बहुल समाजास वाद्यांचा, फटाक्यांचा, ते काही नसेल तर गाठ्या-फाफडा खात इतरांचे डोके उठवणारा गोंगाट करणे, हे पौरुषत्वाचे लक्षण वाटू लागले आहे. या अशा ‘ वीरपुरुषांची,’ संख्या सध्या वाढत असल्यामुळे हे गोंगाट-सम्राट सगळीकडे पाहायला मिळतात.अगदी विमानातही आपले डबे काढून चरत बसण्यात त्यांना काही वावगे वाटत नाही.हे असे डबे खाण्यात कोणास आक्षेप असण्याचे कारण नाही. पण पिठाच्या गिरणीप्रमाणे तोंडाची चक्की चालू ठेवत हा वर्ग जो वटवट करत असतो, त्यामुळे कोणाही सज्जन भारतीयाची मान लाजेने खाली जाईल. हे असे करणारे स्वतःला सुशिक्षित असल्याचे म्हणवतात. आर्थिकदृष्ट्याही चांगल्या घरातले असतात. विक्रम सिंह यांच्यावर हल्ला करणारे रिकामटेकडे आणि हे या दोहोंत अक्कलशून्यता हा समान धागा असतो. त्यात विक्रम सिंह यांच्यावरील हल्लेखोरांची आर्थिक परिस्थितीही अधिक हलाखीची असणार. म्हणून त्यांच्या मनातील विखारही अधिक तीव्र. आपल्या गोंधळ घालण्यास आक्षेप घेणार्या विक्रम सिंह यांचा या बेफाम तरुणांनी त्याच्या तिसर्या मजल्यावरील घरापर्यंत पाठलाग केला आणि लाथा-बुक्क्यांच्या वर्षावात त्याचा जीव घेतला. या संभाव्य महासत्तेचे नागरिक आता तरी डोळे उघडून आसपास काय सुरू आहे याची दखल घेतील काय ?
अभागी विक्रम सिंह भले दूरच्या मणिपूरचे असतील आणि त्या प्रांतातील सर्वांस नेपाळी म्हणवून हिणवण्याची सोयही आपणास असेल, पण त्यांच्याबाबत जे झाले ते आता तितके दूरचे राहिलेले नाही. विद्यानगरी वगैरे असलेल्या पुण्यात कोणा विद्यानंद बापट या तरुणावर ज्या कारणासाठी हल्ला होतो. त्याच कारणासाठी विक्रम सिंह यांचा जीव घेतला जातो. दोन्हीही घटनांतील हल्लेखोरांची मानसिकता सारखीच, तिच्या प्रदर्शनाने आपण समाज म्हणून अजूनही किती मागासलेलो आहोत हेच दिसून येते. दळणवळणाच्या कोणत्याही सोयीसुविधा विकसित झालेल्या नव्हत्या, त्या काळी माणसे एकमेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्याने बोलत, आवाज करत आणि भडक रंगाचा वापर करत. पुढे माणसाची प्रगती झाली. ते प्रगतीचे वारे आपल्यातील काहींना वळसा घालून पुढे गेले असावेत. कारण प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना अंगी विकसित होणारी सभ्यता,समंजसपणा व इतरांचा आदर करण्याची वृत्ती,इ.गुणांचा आपल्यातील अनेकांशी कित्येक पिढ्यांत संबंध आल्याचे आढळत नाही. या अशांचे सर्व काही भडक आणि बटबटीत. त्यांची संख्याही अधिक आणि लोकशाहीत संख्या ही महत्त्वाची असते. योग्य की अयोग्य हा मुद्दाच नसतो. सर्व काही बहुमत व अल्पमतावर ठरणार. ‘‘ बर्याचदा बहुमत म्हणजे सर्व मूर्ख एकाच बाजूस असणे, ’’ असे म्हणण्याची हिंमत दाखवणारे जॉन एफ. केनेडी आणि त्यांचा खरा लोकशाहीवाद या अशा बहुमती बलवंतांच्या आकलनापलीकडे असल्याने त्याचा दाखला देणे,तसे चुकीचेच. परंतु कोणीतरी कोणाच्या तरी केवळ गोंगाट करण्यावर आक्षेप घेतो, म्हणून त्याचा जीव घेतला जात असेल तर अशा समाजास आपण काय म्हणायचे ? ही इतकी असंवेदनशीलता येते कोठून ? आली तरी तिला अंगी इतके कसे काय मुरू दिले जाते ?
विक्रम सिंह यांच्या हत्येबाबत असा प्रश्न पडतो, कारण तो ज्या प्रांतातून येतो ते राज्य सध्या आपल्या सामायिक असंवेदनशीलतेचा अनुभव सातत्याने घेत आहे. याच राज्यातील महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली. तरीही आपल्याला त्याचे काहीही वाटले नाही. त्या राज्यातील कुकी आणि मैतेई समाजाच्या संघर्षात हजारो मारले गेले. त्याही वेळी मरणारे अन्य धर्मीय आहेत, यात अनेकांनी समाधान मानले. अन्यत्र अशा अशांत प्रदेशात केवळ लष्कर तैनात करण्यात येत आहे.या वृत्ताने शांतता निर्माण होऊ लागते. परंतु याच मणिपुरात प्रक्षुब्ध जमावाने लष्करालाही लक्ष्य केले आणि सरकारी शस्त्रागारही लुटले. तरीही कोणाची झोप उडाली नाही. या राज्यातील अशांततेचा आगडोंब शांत करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्यास तेथे जाण्यास कित्येक महिने, वर्षे लागली. तरीही परिस्थिती शांत झाली नाही ती नाहीच. मुख्यमंत्र्यांविरोधात अन्य मंत्र्यांनी बंड केले, मंत्र्यांविरोधात आणखी कोणी बंडाचा झेंडा उगारला, हे असे अन्य कोणा राज्यात झाले असते तर प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांनी संपूर्ण राज्य ढवळून काढले असते.पण प्रश्न मणिपूरचा, तेही ईशान्येकडील एक राज्य,तेथील माणसे दिसण्या- बोलण्यापासून बहुसंख्याक भारतीयांपेक्षा वेगळी. पण तेथील कोणत्याच संकटाने कोणाच्या मनावर ओरखडा उमटल्याचे कधीच जाणवले नाही. आता तर त्या राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय कलावंत हकनाक मारला गेला. विक्रम सिंह याचे घराणे कलावंताचे. गाणे हे त्याच्या रक्तात आहे.त्याची आई आज ८५ वर्षांची आहे. मणिपूरच्या लता मंगेशकर अशी त्यांची ओळख. आजही त्या शास्त्रीय संगीताच्या शिकवण्या घेतात. याच गाण्याच्या प्रेमापोटी त्यांचा मुलगा राजधानी दिल्लीत आला. सुरांवर मनापासून प्रेम करणार्या या कलावंताने आसमंतात ठासून भरून राहिलेल्या बदसुरास आक्षेप घेतला आणि तो जीव गमावून बसला.
ही घटना काय, पुण्यात बापटांस झालेली मारहाण काय ? हे सगळे इशारे आहेत. बहुमताच्या बदसुरांस आक्षेप घेणार्या अल्पसंख्याकास दिले जाणारे. त्या मागील अर्थ एकच,आम्ही गोंगाट करणार, आम्ही बेशिस्त वागणार, आम्ही नियमभंग करणार… कारण आम्ही बहुमतात आहोत. जे आक्षेप घेऊ इच्छितात, त्यांनी ते खुशाल घ्यावेत. त्याने काहीही फरक पडणार नाही. पोलीस त्यांच्याकडे पाहणारही नाहीत, न्यायपालिका फार फार तर त्रागा व्यक्त करेल, पण कसला ठोस आदेश देणार नाही आणि प्रशासन तर तेवढेही करणार नाही.कारण ते बहुमतास बांधील असततात.तेव्हा गुमान आम्हास सामील व्हा अन्यथा कानात बोळे घालून गप्प बसा,असा या सगळ्याचा अर्थ. विक्रम सिंह यांस तो आधीच लक्षात आला असता तर तो घरी येऊन, दारे-खिडक्या बंद करून गिटारच्या तारा छेडत मन रिझवत राहीला असता, पण त्याने ते केले नाही. उगाच बहुमताचे प्रतिनिधित्व करणार्यांस आव्हान देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्या बदल्यात त्याने जीव गमावला. बहुमतखोरांच्या विरोधात जाण्याआधी आपली वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुले-बाळे यांचा विचार त्याने केला असता तर कदाचित हे कृत्य त्याने केलेही नसते. या जर-तर शब्दप्रयोगास आता काही अर्थ नाही. तो काही परत येणार नाही आणि त्याच्या गिटारच्या तारा काही परत झंकारणार नाहीत. या बहुसंख्याक वादाची नशा इतकी तीव्र आहे की आपली प्रगती नव्हे, अधोगती सुरू आहे हेही अनेकांस लक्षात येत नाही. आपला प्रवास आधुनिकतेकडे नव्हे तर आदिमतेकडे सुरू आहे, हेही अनेकांना जाणवत नाही.
तथापि कोणत्याही समाजाची प्रगती तेव्हा होते जेव्हा तो समाज बहुमत-अल्पमत यापेक्षा योग्य-अयोग्य अशी फारकत करू लागतो. हे व्हायला हवे. अन्यथा विक्रम सिंह यांच्यासारख्यांचे बळी जातच राहतील. ते मरण सामूहिक शहाणपणाचे असते.
कोणीतरी कोणाच्या तरी केवळ गोंगाट करण्यावर आक्षेप घेतो म्हणून त्याचा जीव घेतला जात असेल तर अशा समाजास काय म्हणायचे ? ही इतकी असंवेदनशीलता येते कोठून ? आली तरी तिला अंगी इतके कसे काय मुरू दिले जाते ?

