दीपक मोहिते,
विरार पूर्वेस
मौजे भालीवली, ता. वसई, जि. पालघर येथील सिंचन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत सदर अतिक्रमणाची तात्काळ पाहणी करून ते हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस जोसेफ डिसिल्व्हा यांनी तहसीलदार, वसई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, भालीवली येथील गट क्र. ३६, क्षेत्र १२ गुंठे, हिस्सा क्र. २३, क्षेत्रफळ ५.८ आर. ही सिंचन विभागाची शासकीय जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे शासकीय जमिनीचा वापर बाधित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाची महसूल विभाग, सिंचन विभाग व संबंधित यंत्रणेकडून संयुक्त पाहणी करून वस्तुस्थितीची खातरजमा करण्यात यावी, तसेच अतिक्रमण आढळल्यास त्याचा पंचनामा करून प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डिसिल्व्हा यांनी केली आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर सदर शासकीय जागा शासनाच्या ताब्यात घेऊन संबंधित अभिलेखांमध्ये आवश्यक नोंद करण्यात यावी. तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमणामुळे सार्वजनिक हिताचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीनुसार कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनीही केली आहे.
निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी ( प्रांत अधिकारी ), वसई विभाग तसेच जिल्हाधिकारी, पालघर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता महसूल व सिंचन विभाग या तक्रारीवर कोणती कार्यवाही करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

