दीपक मोहिते,
आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत,
राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. ग्राहकांच्या अनेक संघटना याप्रकरणी न्यायालयात गेल्या आहेत. तर अनेक ग्राहक हे वीजग्राहक संस्थांकडे दाद मागत आहेत. परंतु ज्या उद्योगपतीकडे या स्मार्टमिटरचे दायित्व आहे,ते अदानी तुमच्या आमच्या मागणीला भीक घालतील, अशी सुतराम शक्यता नाही. तसेच त्यांच्यासमोर गुडघे टेकणाऱ्या आपल्या सरकारकडून याविषयी काही निर्णय होईल, अशी शक्यताही नाही.
या प्रकरणी विरोधी पक्षांनी राज्यसरकार विरोधात जोरदार टीकेची झोड उठवली असली तरी एकाही राजकीय पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही.
पण, वसई तालुका मात्र त्यास अपवाद ठरला. दोन दिवसापूर्वी वसई येथे सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. सुरुवातीस मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचे ठरले होते. पण अचानक या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. महामार्गावर आंदोलन केल्यास आपल्यावर गुन्हे दाखल होतील, तसेच रास्ता रोको करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ जमा होणार नाही. अशा दुहेरी भितीतून हा मोर्चा वसई पूर्व ते महावितरण मुख्य कार्यालय असा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय नेते, आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घेत असतात,त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. या मोर्च्यात सर्वसामान्य वीजग्राहक किती सहभागी झाले होते, हा एक संशोधनाचा विषय आहे. ग्राहक कमी व पक्षाचे पदाधिकारी / कार्यकर्त्यांचा भरणा अधिक, असे या मोर्चाचे एकंदरीत स्वरूप होते. या मोर्चात किती आंदोलक होते, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. हा मोर्चा पार पडल्यानंतर विरार पश्चिम भागातील ग्लोबल सिटी या मध्यमवर्गीय नागरी वसाहतीमधील काही जागरूक महिलांनी सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर वसाहतीमध्ये स्मार्ट मीटर लावण्याचे कंत्राट व त्यासाठी कॅम्प घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे या मोर्चाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या संदर्भात या कार्यकर्त्याने खुलासा करणारा विडियो वायरल केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मी स्मार्ट मीटर लावले नाहीत, यासंदर्भात एक तरी कागदपत्र दाखवावे,कॅम्प मी जरूर घेतला, पण तो भरमसाठ वीजेची बिले येण्यासंदर्भात होता. त्यांच्या या वक्तव्यावर त्या महिलांनी पलटवार करत,वीजेची बिले अधिक येतात म्हणून कॅम्प लावला की स्मार्टमिटर कशी उपयुक्त आहेत, हे सांगण्यासाठी ? हे त्यांनी स्पष्ट करावे, आम्ही त्यासंदर्भात पुरावे देऊ, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सब कॉन्ट्रॅक्टर हा कधीच कागदोपत्री नसतो,आणि असलाच तर मूळ मालक हा बेनामी माणूस उभा करतो व कामे करतो. त्यामुळे या कार्यकर्त्याचा खुलासा केवळ हास्यास्पद आहे. एकीकडे स्मार्टमीटर कसे उपयुक्त आहे, यासाठी कॅम्प लावायचे तर दुसरीकडे आंदोलनात सहभागी होऊन बेंबीच्या देठापासून स्मार्टमिटरच्या विरोधात कोकलायचे,असा दुटप्पीपणा न ओळखण्याइतके आम्ही सुशिक्षित वसईकर नक्कीच दुधखुळे नाहीत, हे त्या कार्यकर्त्याने लक्षात ठेवावे,

