दीपक मोहिते,
सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
वसई विरार शहर महानगरपालिकेने वसईचे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच स्मारकाची उभारणी करण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले आहे. सदर बाब कौतुकास्पद असून या ऐतिहासिक नगरीतील प्रत्येक नागरिकांनी त्याचे स्वागत करायलाच हवे. या महानगरपालिकेला सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही उपरती का व्हावी ? असा प्रश्न नक्कीच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो. सर्वप्रथम या ऐतिहासिक नगरीचे वैभव गेल्या ४० वर्षात कोणी हिरावून घेतले. या निसर्गसंपन्न परिसराला सिमेंट – काँक्रिटचे ओंगळ स्वरूप कसे आले ? विकास या गोंडस शब्दाखाली या ऐतिहासिक नगरीची वाताहत कोणी केली ? याचा सर्वप्रथम अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा.
वसई विरार महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत शहराचा ऐतिहासिक वारसा जपणे व विविध स्मारकांच्या उभारणीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच नालासोपारा शहराचे नाव बदलून ” शूर्पारक नगरी, ” करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली. महापौर अजीव पाटील यांनी याविषयी बोलताना याप्रकरणी आम्ही देखील याविषयी सकारात्मक आहोत, तसेच केवळ नालासोपारा नव्हे तर वसई विरार महापालिकेचे नाव शूर्पारक करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
शूर्पारक नगरी ( आजचे नालासोपारा ) हे पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका क्षेत्रातील एक अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक नगरी आहे. प्राचीन काळी ही नगरी कोकण प्रांताची राजधानी म्हणून ओळखली जात असे. नालासोपारा येथे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप असून, या स्थानाला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे. आज जरी नालासोपारा हे मुंबईचे एक उपनगर मानले जात असले, तरी प्राचीन काळी ते पश्चिम भारतातील सर्वात मोठे आणि समृद्ध आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ओळखले जात होते.
या नगरीला साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे नालासोपाऱ्याचे नाव बदलून ते शूर्पारक नगरी करा, अशी मागणी नुकताच झालेल्या महासभेत करण्यात आली. एकेकाळी ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नालासोपारा शहराची विविध माध्यमातून बदनामी होत असते. तर दुसरीकडे संपूर्ण भारतातील लोकं शूर्पारक नगरी शोधत येतात. पण नालासोपारा स्थानक वगळता काही सापडत नाही,असे विरोधी पक्षांनी चर्चेदरम्यान ऐतिहासिक वारसा जतन होण्याच्या दृष्टीने यावर सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.
विरोधकांनी केलेली मागणी व सत्ताधारी पक्षाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद, हे लक्षात घेता ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नक्कीच संयुक्तरित्या प्रयत्न होतील. पण, तत्पूर्वी या ऐतिहासिक नगरी नव्हे तर बकाल झालेल्या शहरातील नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्यावर एक नजर टाकायला हवी. सर्वप्रथम या ऐतिहासिक नगरीला बकालपणा का आला ? त्याला जबाबदार कोण ? याचा विचार व्हायला हवा. लोकांना प्यायला पुरेसे पाणी नाही, दर पावसाळ्यात घराघरात पाणी शिरून हाहाकार उडतो, किमान तीन दिवस जनजीवन ठप्प होते, शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य, कचऱ्याने तुडुंब तुडुंब भरलेले नाले, अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट, कायदा – सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती, ही या शहराची सध्या वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत महानगरपालिका या शहराला ऐतिहासिक नगरी म्हणून पुन्हा नावारूपाला आणणार असेल तर ” वेड पांघरून,पेडगावला जाण्यासारखे, ” आहे. या शहराला ऐतिहासिक स्वरूप देण्यापूर्वी या मंडळीनी त्याकाळात शूर्पारकनगरी कशी होती ? याविषयी सर्वप्रथम अभ्यास करायला हवा.
यापूर्वी राज्याचे तत्कालीन सचिव गायकवाड असताना या विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा वसई विरार महापालिकेचे नाव ही शूर्पारक करावे विचार पुढे आला होता. त्यादृष्टीने सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पडताळून पाहिल्या जात आहेत, असे महापौर अजीव पाटील यांनी यावेळी सांगितले. पण या शहराचे नांव बदलताना येथील नागरिकांचे जीवन सुसह्य कसे होईल ? याचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा. वसईचा ऐतिहासिक किल्ला आज धायमोकलून रडतोय, दिवसांगणिक तो ढासळतोय. त्याच्याकडे पाहण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. कचरा व नालेसफाईची टेंडर्समध्ये अडकून पडलेली ही मंडळी शूर्पारक नगरीची दिवास्वप्ने आपल्याला दाखवत आहेत. हे सर्व उपदव्याप करण्याऐवजी सत्ताधारी व बिरोधकांनी सर्वसामान्य माणसाला सुखी जीवन कसे जगता येईल, यावर विचार करावा. त्यांनी व्यक्त केलेल्या मनोदयाला वसईकर जनतेचा पाठिंबा मिळेल,पण आमचे दैनंदिन जीवन सुसह्य करा, ही त्यांची मागणी पूर्ण झाली तरच…

