दीपक मोहिते,
वसईत स्मार्ट मीटरविरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
वसई तालुक्यात महावितरणतर्फे जुने वीज मीटर बदलून त्याजागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मात्र या स्मार्ट मीटरमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. वीजदेयकात अवाजवी आणि दुप्पट वाढ होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच ग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जुने मीटर काढून थेट नवीन मीटर लावण्यात येत असल्यामुळे महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
याप्रकरणी वसई-विरारमधील सर्व राजकीय पक्ष एकवटले
असून प्रशासना विरोधात येत्या ७ सप्टें. रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड फाटा, के. टी. रिसॉर्टसमोर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या ज्वलंत विषयी वसई-विरार शहर महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीज बिलं आणि मीटर बदलण्याच्या मनमानी कारभारावर सविस्तर चर्चा होऊन आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला काँग्रेस, शिवसेना ( उबाठा ), मनसे आणि लाल बावटा आणि अन्य विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७ सप्टें. रोजी होणाऱ्या या आंदोलना दरम्यान महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
महापौर अजीव पाटील यांनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज देयके येत असल्यामुळे वसई-विरारची जनता अत्यंत त्रस्त झाली आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि शासनाकडे नागरिकांच्या हक्काची दाद मागण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग
निवडला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी अवाजवी बिलांमुळे तुटपुंजा पगार असणाऱ्या कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ही दरवाढ त्यांना कशी परवडणार? म्हणूनच आम्ही हे आंदोलन उभे करत असून, असे सांगितले.

