दीपक मोहिते,
दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार
अजितदादाच्या अकाली जाण्यावर राजकारण करू नका, या प्रकरणी अधून मधून जी मिडिया ट्रायल होत असते, ती योग्य नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नांव न घेता टीका केली.
गेल्या आठवड्यात खा. सुप्रिया सुळे यांनी ” माझा भाऊ गेला, आणि काही आमदार सत्ता भोगत आहेत,” अशी खोचक टीका केली होती. त्यास उत्तर देताना सुनेत्रा पवार यांनी काल माध्यमाशी बोलताना सुळे यांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्या पुढे म्हणाल्या, दादांच्या जाण्याबाबत सर्वाना वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे आणि त्यादृष्टीने आम्ही पाठपुरावा करत आहोत. दादाच्या जाण्याने महाराष्ट्रासह मी व माझ्या मुलांवर आकाश कोसळले आहे. दादांची आई, मी व माझी मुले यांच्यापेक्षा अधिक दुःख कोणाला असू शकते. त्यामुळे दादांच्या जाण्यावर कोणीही राजकारण करू नये व वारंवार माध्यमासमोर जाऊन मिडिया ट्रायल करू नये, अशा शब्दात त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नांव न घेता चांगलेच फटकारले. यावेळी त्या खूप भावुक झाल्या होत्या. या सर्व घडामोडीवरून नणंद – भावजयी यांच्यातील नातेसंबंध ताणले गेल्याचे स्पष्ट झाले असून पवार कुटुंबातही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले.

