दीपक मोहिते,
नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका,
गेल्या महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटामध्ये सुमारे ५ हजार लोक अद्याप गायब आहेत. या आपत्तीमध्ये हजारो कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. मदतीचे कार्य अद्याप सुरू आहे. या अस्मानी संकटामुळे नेपाळ हा पार खचून गेला आहे. त्याला सावरण्यासाठी जगभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पण झालेल्या विध्वंसाचे प्रमाण लक्षात घेता हिमालयाच्या कुशीत विसावलेल्या या छोटेखानी देशाला सावरायला किमान पाच वर्षे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षापासून हिमालयातील अनेक हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्याचा भारतालाही धोका होऊ शकतो. हिमालय हा भारतासाठी ” वॉटर टॉवर,” आहे, पण तो वेगाने वितळू लागला आहे. १९९० ते २०२० या कालावधीत हिमालयातील या हिमनद्यांनी १२ % क्षेत्र व ९.५% बर्फ गमावला आहे. २०२० च्या दशकात हिमनद्या वितळण्याचा वेग वाढला तर २१०० पर्यंत ५० % हिमनद्या नष्ट होतील. जर तापमान दोन अंशापेक्षा अधिक वाढले तर हिमालयात फक्त ३५ ते ४० % बर्फ शिल्लक राहील. हिमालयात आजच्या घडीला ६३ हजार ७०० हून अधिक हिमनद्या आहेत. त्यापैकी ७४ % गंगा,सिंधू आणि ब्रम्हपुत्रा खोऱ्यात आहेत.
या नद्यामुळे आपल्या ६० % लोकसंख्येला पाणी मिळते. हा बर्फ जर वितळला तर सुरुवातीस महापूर येईल व नंतर नद्या कायमच्या आटतील. बर्फ सतत वितळत असल्यामुळे पर्वतावर नवीन तलाव निर्माण होत आहेत. भारत सरकारने अशा अडीच हजार तलावापैकी पन्नास हून अधिक तलावाना अधिक धोकादायक तलाव म्हणून घोषित केले आहे. या सगळ्याचा सर्वात जास्त धोका हिमाचल प्रदेश या राज्याला आहे. धरणे, हायड्रो पॉवर प्रकल्प, रस्ते हे पाण्याचे वेगवान प्रवाह सहन करतील, अशा पद्धतीने बनवण्यात आलेले नाहीत.त्यामुळे भविष्यात होणारा धोका लक्षात घेऊन भारत सरकार आता दोन हजार तलावाचे सेटेलाईट निरीक्षण करत आहे. या विषयी तज्ञांचे म्हणणे आहे की भागातील काही धरणे बंद करावी लागतील. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता ” आधी महापूर आणि नंतर भीषण दुष्काळ,” अशा दुष्टचक्रात भारत सापडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

