दीपक मोहिते,
मी वसई विरार रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा,
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या सहा दिवसावर आले आहे, पण आमचा बाप्पा सध्या विचारत पडला आहे. माझे प्रामाणिक भक्त मला वसई विरारच्या रस्त्यावरील खड्ड्यातून आणायचे कसे, अशा विवंचनेत सापडले आहेत, तर सत्ताधारी पक्षाची माणसे अदानीच्या स्मार्ट मिटरचा बागुलबोवा उभा करण्यात रमले आहेत.माझ्या सजावटीच्या स्पर्धा ते आवर्जून भरवत असतात, त्यासाठी लाखो रु. ची बक्षिसेही देत असतात, पण या मंडळींना रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात जाग येत नाही. झोपलेल्या माणसाला जागा करता येते, पण झोपण्याचे सोंग करणाऱ्याला कधीच जागे करता येत नाही. असे हे झोपल्याचे सोंग करणाऱ्या माझ्या तथाकथित भक्तांना मला कदापि जागे करता येणार नाही.
वसई विरार भागात दरवर्षी येताना माझ्या पोटात गोळा येतो, असे आमच्या बाप्पाचे म्हणणे आहे. आणि बाप्पाच्या या म्हणण्यात तथ्य देखील आहे. वसई विरार भागातील रस्त्यावरील खड्ड्याचे साम्राज्य पाहता, या भागात बाप्पाला येणे नकोसे होत असते. पण माझ्यावर निस्सीम प्रेम व श्रद्धा बाळगणाऱ्या माझ्या भक्तांना मला नाराज करता येत नाही. त्यामुळे मी दरवर्षी आपला जीव धोक्यात घालुन येथे येत असतो. जातानाही माझ्या जीवाची फार घालमेल होत असते. पर्यावरणपूरक माझी मूर्ती तयार करणे व कृत्रिम तलाव निर्मिती करणारे माझे तथाकथित व्यापारी भक्त माझ्यासाठी खड्डेमुक्त रस्ते का बनवत नाहीत, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. गेली अनेक वर्षे हे असे प्रकार सुरु आहेत. ही मंडळी माझे भक्त असले तरी ते माझे हीतचिंतक नाहीत, हे काही लपून राहिलेले नाही. ज्यांना माझी भिती वाटत नाही, ते करदात्यांना तरी कसे घाबरतील ? असो, मी यंदाही जीव मुठीत धरून कसबसा तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.

