दीपक मोहिते,
पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी,
कल्याण – डोंबिवली मागोमाग पालघर येथेही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केली असून याप्रकरणी हल्लेखोरांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचार त्वरित सुरु न केल्यामुळे संतप्त झालेल्या या हल्लेखोरांनी हा प्रकार केला. न्यायालयाने या प्रकरणी डोंबिवलीचे नगरसेवक रमेश पाटील यांच्याबाबत केलेल्या कठोर कारवाईप्रमाणेच या हल्लेखोरावर कारवाई करण्यात यावी, अशी सर्वत्र मागणी करण्यात येत आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, शहरप्रमुख राहुल घरत, उपतालुकाप्रमुख मनीष उर्फ विकी संख्ये,जिल्हाप्रमुख युवासेना साईराज पाटील,उपतालुका प्रमुख युवासेना रोहित गावित,उपतालुकाप्रमुख राहुल संख्ये व युवासेना विधानसभा प्रमुख ऋषभ वारे, अशा आठ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पण या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा पालघरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात हॉस्पिटल्सची मोडतोड करणे, डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला या विषयी कठोर कायदे करण्यास भाग पाडावे, तरच अशा गैरप्रकाराला आळा बसू शकतो. सार्वजनिक जीवनात वावरताना अशा हाणामारी किंवा मोडतोड करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली की अशा घटनावर नियंत्रण येऊ शकते. ” म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो, ” तसा तो सोकावता कामा नये, यासाठी कायद्यातील कलमे अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने या हल्लेखोर पदाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, ती तात्पुरत्या स्वरूपाची नसावी, कारण हे पदाधिकारी पुन्हा अशा घटना करण्यास धजावतील.

