दीपक मोहिते,
एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा,
वसई विरार शहर महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षात सध्या वारंवार जे मानापमानाचे नाट्य रंगते, त्यामुळे क्षेत्राच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत आहे. या महानगरपालिकेची प्रत्येक महासभा गोंधळात पार पडत असते. आता विषय समित्याच्या बैठकावर देखील बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये समन्वय साधून परिसर विकासाचा गाडा पुढे नेण्यात महापौर यांची भूमिका महत्वाची असते, पण विद्यमान महापौर देखील ती पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे.
एकमेकांची मदत व सहकार्य, यावर आम्ही विकासाची कामे करू,अशा हाणाभाका घेणारे व आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता विकासाच्या प्रश्नावर एकमेकांच्या उरावर बसताना पहायला मिळत आहे. सोळा वर्षांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली. या काळात केंद्र, राज्य, वित्त व विविध प्राधिकरणाकडून हजारो कोटी रु. ची अनुदाने या महानगरपालिकेला मिळाली, पण लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेचे अधिकारी यांनी या अनुदानाचा अक्षरशः फडशा पाडला. शेजारी असलेले मिरा – भाईंदर, ठाणे, नवी मुंबई या तीन महानगरपालिका क्षेत्रातील विकासाच्या तुलनेत वसई विरार क्षेत्र हे कात टाकू शकले नाही. वीस वर्षांपूर्वी या मनपातील तीन महानगरांना असलेला बकालपणा आजही कायम आहे. विकासाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामध्ये पाणी, आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधाचा समावेश आहे. सध्या या महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत होणारा गोंधळ रोखणे, हे महापौरांचे कर्तव्य आहे. पण ते ती पार पाडत नाहीत. वास्तविक विरोधीपक्ष नेत्यानेही समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे. महासभेत गोंधळ घालणे, हे लोकशाही व्यवस्थेत हत्यार ठरता कामा नये. या दोघांनी समन्वयाने विकासाचा गाडा हाकलला तर त्यामध्ये नागरिकांचेही भले आहे. कारण नोकरशाहीला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. ते केवळ येतात ते स्वतःचे खिसे भरायला, मनपाचा एक वरिष्ठ अधिकारी कचऱ्याचे टेंडर मिळवणाऱ्या ठेकेदाराला तीन टक्के कमिशनसाठी कसा पिडतो, याच्या सुरस कथा महानगरपालिकेच्या आवारात कानावर पडत असतात. या अधिकाऱ्यांना परिसर विकासासंदर्भात कसलेही सोयरसुतक नाही. त्यांना केवळ पोट फुटेपर्यंत खायचे आहे आणि सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या उरावर बसत त्यांना रान मोकळे करून देत आहेत.

