दीपक मोहिते,
‘अमृत-सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना,
कचरा म्हणजे केवळ विल्हेवाट लावण्याची समस्या नसून, त्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर केल्यास तो उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो. याच संकल्पनेला उद्योजकतेची जोड देत ‘अमृत-सक्षम,’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांना कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून मूल्यनिर्मिती करून नियमित उत्पन्नाचा स्रोत आणि शाश्वत व्यवसाय उभारता येतो. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूप तयार करणे, प्लास्टिक, कागद आणि काचेचे पुनर्वापरासाठी संकलन व प्रक्रिया करणे तसेच ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ (आरआरआर ) सुरू करणे, अशा विविध व्यवसायांच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत.
संकल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत मार्गदर्शन
‘अमृत-सक्षम,’ हे केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित नसून, व्यवसायाची संकल्पना निश्चित करण्यापासून प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंत मार्गदर्शन करणारा उपक्रम आहे. इच्छुक उमेदवारांना योग्य व्यवसायाची निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना व अनुदानाचा लाभ, उत्पादनाची विक्री आणि बाजारपेठ मिळवणे, याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोड मिळाल्यास कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड उभारण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.त्यासाठी
पूर्वानुभवाची गरज नाही.
या उपक्रमासाठी संबंधित क्षेत्रातील पूर्वानुभव आवश्यक नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होऊ शकतात.
‘अमृत,’ संस्थेच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना संस्थेतर्फे विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामध्ये उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांसह ‘अमृत वैयक्तिक व्याज परतावा योजना,’ यांचाही समावेश आहे.
प्रशिक्षणानंतर क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पात्र उमेदवारांना शासकीय योजनांतर्गत उपलब्ध सहाय्य तसेच बाजारपेठेतील खरेदीदार आणि अन्य उद्योजकांशी संपर्काची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ प्रशिक्षण न घेता प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि व्यवसायिक नेटवर्क विकसित करण्यास मदत होणार आहे.
‘अमृत-सक्षम’मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावरूनही नोंदणी करता येईल.
नोंदणीनंतर ‘अमृत-सक्षम,’ ची टीम पात्र उमेदवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती देणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील ‘अमृत,’ च्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा.
पालघर जिल्ह्यासाठी अधिक माहितीसाठी अमित आठवले, जिल्हा उपव्यवस्थापक, पालघर ९११ – २२२६५३० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

