दीपक मोहिते,
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा,
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ( एनएच – ४८ ) हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा सर्वात महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हा महामार्ग वाहतूककोंडीमुळे सतत चर्चेत आहे. येथे होत असलेल्या वाहतूककोंडीवर लिहून लिहून माध्यमे थकली पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र झोपेतून जागे होऊ शकले नाहीत.
सर्वात जास्त त्रास वसई-विरार, पालघर, काजूपाडा ते बापाणे फाटा, वर्सोवा ब्रिज, मिरा-भाईंदर पट्ट्यात होत असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री देखील याच महामार्गावरून येजा करत असतात. पण त्यांनाही प्रवाशांचे दुःख कधी कळू शकले नाही.एकदा वाहतूककोंडी झाली की १० कि.मी.पर्यंत रांगा लागतात. ५ दिवस सलग जाम राहिल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.
दहिसर टोलनाक्यापासून तलासरीपर्यंत २९ कि.मी. रस्त्याचे ६०० कोटी रु.चे व्हाईट टॉपिंग काम सुरू आहे. काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. घोडबंदर रोडच्या दुरुस्तीमुळे सर्व जड वाहने याच मार्गावर वळवली जात आहेत.
सर्व्हिस रोडवर गॅरेज, हॉटेलांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केली आहेत. बाहेरच्या लेनमध्ये ट्रक दुरुस्तीसाठी उभे केले जातात.
गेल्या वर्षी १२ शाळा बस, ५०० हून अधिक विद्यार्थी विरारजवळ पिकनिकवरून येताना १२ तास वाहतूककोंडीमध्ये अडकले होते. त्यावेळी मुलांना अन्न-पाणी देखील मिळाले नाही.रुग्णवाहिका, विमान पकडण्यासाठी जाणारे प्रवासी या महामार्गांवर तासनतास अडकतात. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे कि ” मंत्र्यांचा ताफा अडकला की पोलीस तत्परतेने हालचाल करतात, सामान्य माणसासाठी हा महामार्ग कायमचा पार्किंग लॉट बनला आहे.”
वाहतूक पोलीस सांगतात की बंद पडलेले कंटेनर हटवणे, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना रोखणे इ. कामे आम्ही करत असतो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले की १२१ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे, सातीवली फ्लायओव्हर लवकरच सुरू होईल. जड वाहनांसाठी वेळेचे बंधन, पर्यायी फेरी सेवेची क्षमता वाढवणे आणि कामाचे योग्य नियोजन करावे,अशी मागणी स्थानिक जनतेने केली आहे.

