जव्हार प्रतिनिधी,
जांभूळविहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत रायतळे हद्दीतील हिल टॉप रेसिडेन्सी, जांभूळविहीर पूर्व येथे निवासी परिसरात सुरू असलेल्या भंगार व्यवसायामुळे नागरिकांना सध्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भंगार साठवणूक, कचऱ्याचे ढिगारे, मोठ्या आवाजातील मशिनरी तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित भंगार दुकान व कचरा साठा तातडीने हटवण्याची मागणी रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नबी रसूल सय्यद हे या परिसरात सन २०१२-१३ पासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करीत असून परिसरातील मोकळ्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात भंगाराची साठवणूक केली जाते. त्यामुळे निवासी वसाहतीतील मोकळ्या जागा तसेच रस्त्यांच्या परिसरात पत्र्याचे तुकडे, लोखंडी तारा, काचेचे तुकडे, खिळे आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
या भंगारामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण झाली असून पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच घुशी, उंदीर आणि साप यांचा वावरही वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मशिनरीच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त
भंगाराच्या साठवणुकीसोबतच प्रेस मशीनच्या साहाय्याने भंगार प्रेस करणे तसेच कटर मशीनने लोखंडी साहित्य कापण्याचे काम केले जाते. या मशिनरीमुळे निर्माण होणारा सततचा मोठा आवाज शेजारी राहणाऱ्या रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तसेच स्कूल बस व इतर वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याशिवाय प्लास्टिक व इतर ज्वलनशील कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने आगीची दुर्घटना होण्याची शक्यताही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही.
या समस्येबाबत जांभूळविहीर पूर्व येथील रहिवाशांनी एकत्रितपणे स्वाक्षऱ्या करून ग्रामपंचायत रायतळे कार्यालयाकडे सुमारे महिनाभरापूर्वी लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
त्यामुळे आता संबंधित प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ पाहणी करून भंगार व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या व नियमांची तपासणी करावी, निवासी भागातील भंगार साठा व कचऱ्याचे ढिगारे हटवावेत, मशिनरीमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
“निवासी परिसरातील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शांततापूर्ण जीवनाचा अधिकार लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे. भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी,” अशी मागणी जांभूळविहीर पूर्व येथील रहिवाशांनी केली आहे.

