दीपक मोहिते,
सारासार विचार करण्याची गरज आहे…
*वसई तालुका व मिरा – भाईंदर हे दोन्ही परिसर दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत आहेत. मराठी – इतर भाषिक, मराठी – जैन व आता हिंदू – इतर असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात राहायचे असल्यास मराठी भाषा बोलता आली पाहिजे, पर्युषण काळात मांस – मासे विक्रीला बंदी, मुलांच्या डब्यातील खाद्यपदार्थात लसूण व कांदा असू नये, यावरून मिरा – भाईंदर परिसर सध्या चांगलाच गाजू लागला आहे. तर दुसरीकडे वसई तालुक्यात गणेश चतुर्थी सणाच्या तयारीसाठी महानगरपालिका प्रशासनाने बिगर हिंदूंना कामाचे ठेके देण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र भाजपच्या एका नगरसेवकाने दिले आहे. या सर्व घडामोडीमुळे हे दोन्ही परिसर सध्या ढवळून निघाले आहेत.
या प्रकरणी मिरा – भाईंदरचे आ. नरेंद्र मेहता यांनी आपल्या खुलाश्यात,ही सक्ती नसून फक्त सूचना केल्याचे स्पष्ट केले आहे. पण त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ऐन सणासुदीच्या काळात समाजात तेढ निर्माण होईल, अशी कृत्ये करणाऱ्या शक्तींना सरकारने रोखले पाहिजे. आजच्या घडीला मटण व मच्छी विक्री व्यवसायावर हजारो कुटुंबे आपला दैनंदिन उदरनिर्वाह चालवतात, त्यांच्या रोजी व रोटीचे काय ? त्यामुळे सरकारने वातावरण गढूळ होणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक ठरते. दुसरीकडे गणेश चतुर्थी सणात मंडप उभारणे, इलेक्ट्रिकची कामे, स्टेजचे साहित्य व खुर्च्या, हार व फुले, डीजे व वाहने पुरवणे,अशी अनेक कामे ठेकेदारांना देण्यात येत असतात. आजवर ही कामे ठेकेदार कोणत्या धर्माचा आहे, हे कधीही पाहिले गेले नाही. या कामात अनेक ठेकेदार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. त्यामुळे अशाप्रकारची मागणी करणे, म्हणजे या अशा ठेकदाराच्या कुटुंबाना आर्थिक खाईत ढकलण्यासारखे आहे. यांना ठेके दिल्यामुळे पावित्र्य नष्ट होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. असं जर होत असेल तर दहीहंडी व इतर हिंदू सणाच्या वेळी सलमान खान व इतर बिगर हिंदू नटाना स्टेजवर मानाचे स्थान का देण्यात येते ? त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्याऐवजी मागणी करणाऱ्यांनी याविषयी सारासार विचार करण्याची गरज आहे. एकेकाळी सामाजिक व धार्मिक सलोखा पाळणारे हे दोन्ही परिसर विस्कळीत होता कामा नयेत, याची दक्षता मागणी करणाऱ्यांनी तर घ्यायला हवीच,तसेच सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी याविषयी खंबीर पावले उचलायला हवीत.

