दीपक मोहिते,
अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,
सर्वोच्च न्यायालयाने आज कुख्यात गँगस्टर अबू सालेमची तातडीने सुटका करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०२६ मध्ये त्याची याचिका ” अकाली आणि गैरसमजुतीची,” म्हणून फेटाळली होती, तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला आहे.
अबू सालेमने दावा केला होता की भारत-पोर्तुगाल प्रत्यार्पण करारानुसार त्याला २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही आणि त्याने ती शिक्षा पूर्ण केली आहे. त्याने चांगल्या वर्तणुकीसाठी मिळालेली ३ वर्ष २ महिन्यांची सूट ( रीमिशन ) आणि विचाराधीन कैदी म्हणून घालवलेला काळ २५ वर्षांत धरावा, अशी मागणी केली होती.सरकारने सांगितले की सालेमला ११ नोव्हें. २००५ रोजी पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले. त्यामुळे २५ वर्षांचा कालावधी नोव्हें.२०३० मध्येच पूर्ण होईल. आत्तापर्यंत केवळ १९ वर्षे ५ महिने शिक्षा पूर्ण झाली आहे.
दाऊद इब्राहिमचा माजी साथीदार असलेला अबू सालेम हा
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात गुजरातहून मुंबईत शस्त्रे आणण्याच्या कामात दोषी ठरला होता.यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात २५७ लोक मारले गेले होते. २०१५ मध्ये बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात जन्मठेप आणि २०१७ मध्ये १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात दुसरी जन्मठेप, अशी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती.२००५ मध्ये भारत सरकारने पोर्तुगालला आश्वासन दिले होते की त्याला फाशी दिली जाणार नाही आणि २५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होणार नाही, त्या आधारावर त्याचे प्रत्यार्पण झाले होते.
२०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की भारत पोर्तुगालला दिलेल्या आश्वासनाला बांधील आहे, पण त्याच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना शिफारस केंद्रच करेल. २०३० पूर्वी त्याची सुटका होणार नाही.अबू सालेमला आता नोव्हें. २०३० पर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे.

