दीपक मोहिते,
राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे,
एकेकाळी राजकारणातला ” पप्पू,” म्हणून ज्या राहुल गांधी यांना भाजपच्या आयटी सेलने सतत हिणवले, त्या भाजपला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधी संसदेत व बाहेर भारी पडले आहेत. संसदेत राहुल गांधी व त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्या तोफखान्याला तोंड देताना भाजप हतबल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणप्रकरणी हे दोघे बहीणभाऊ संसदेत आपली कोंडी करतील, अशा भितीतून मोदी व शहा जोडगोळीने संसदेत उपस्थित राहणे टाळले. संसदेच्या इतिहासात आजवर असे कधीच घडले नव्हते. तरीही या प्रकरणी मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. बारा वर्षांपूर्वी भाजपच्या आयटी सेलने राहुल गांधी यांची येथेच्छ बदनामी केली. ती निमूटपणे सहन करत राहुल गांधी यांनी आपल्या नेतृत्व गुणांनी भाजपला खूप मागे टाकले आहे.
राहुल गांधी यांच्या राजकीय वाटचाली संदर्भात राजकीय क्षेत्रात दोन मुख्य चर्चा आहेत. एक म्हणजे त्यांच्या प्रतिमेत झालेला बदल आणि दुसरे म्हणजे २०२४ नंतर त्यांनी पक्ष मजबुतीसाठी केलेले अपार परिश्रम होय. २०२३ – २४ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा ज्या दोन पदयात्रा करत थेट जनतेशी संवाद साधला, त्यामुळे त्यांची वेगळी प्रतिमा तयार झाली. तत्पूर्वी त्यांच्यावर ” दिल्ली केंद्रित नेते, ” अशी टीका होत होती, ती या दोन पदयात्रामुळे कमी झाली. या सर्व घडामोडीनंतर संसदेत विरोधी पक्ष नेता,या नात्याने मोदी सरकारची वेळोवेळी कोंडी केली, त्यामुळे मोदी सरकार अनेकदा बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सरकारला घेरण्यासंदर्भात तसेच कोणते मुद्दे उपस्थित करायचे ? याविषयी त्यांच्याकडे असलेले भान व समयसूचकता या दोन्ही बाबी वाखाणण्याजोग्या आहेत. बेरोजगारी, महागाई, जातगणना, शेतमालाला आधारभूत किंमत, संविधान, राममंदिर चोरी, विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण, मणिपूर वांशिक दंगल या ज्वलंत विषयी त्यांनी मोदी सरकारची अक्षरशः पिसे काढली. दुसरीकडे प्रियांका गांधी यांनीही राहुल यांच्या बरोबरीने सरकारवर अभ्यासपूर्ण टिकेची झोड उठवली. या दोघा भाऊ बहिणीच्या आक्रमकतेपुढे मोदी व शहा या दोघांना अधिवेशन काळात सतत ” पळता भुई थोडी, ” झाली. आजच्या घडीला प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचे राजकीय वजन नक्कीच वाढले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आगामी महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, गोवा,पंजाब व मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली आणि जातगणना मुद्दा जनतेपर्यंत पोहोचला तर २०२९ मध्ये राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असतील. सोबत असलेल्या विविध राजकीय पक्षांनी ( तृणमूल, समाजवादी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व द्रमुक ) आपली महत्वाकांक्षा दूर ठेवायला हवी. या दोघा भावंडानी काँग्रेसची संघटना बूथ पातळीवर मजबूत करणे, स्वतःच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्यांमध्ये ( कर्नाटक, तेलंगणा व हिमाचल प्रदेश ) सरकारची कामगिरी दाखवणे व तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आर्थिक विकासाचे ठोस मॉडेल देणे, यावर भर दिला पाहिजे. तसेच इंडिया आघाडी कशी अभेद्य राहील, यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहीले पाहिजे.

