दीपक मोहिते,
हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात,
अमेरिका – इराण युद्धात येमेनचे बंडखोर हुथी यांनी सौदी अरेबियावर ड्रोन व क्षेपणास्त्राच्या साहाय्याने नुकतेच जोरदार हल्ले चढवले, या हल्ल्यात सौदी अरेबियाचे प्रचंड नुकसान झाले. हे हुथी बंडखोर कोण आहेत ? त्यांची अमेरिका व सौदी अरेबिया या दोन देशाशी शत्रूत्व का आहे ? इराण – इस्त्रायल युद्धात ते इराणच्या बाजूने का लढतात ? याविषयींची सगळी माहिती आपण या लेखात घेणार आहोत. सर्वप्रथम या हुथी बंडखोरांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊया.
या हुथी बंडखोरांना पूर्वी अन्सार अल्लाह ( देवाचे समर्थक ) असे म्हंटले जात असे. पण हुथी हे नांव त्यांचे संस्थापक अल हुथी यांच्या नावावरून पडले. हे लोक येमेनच्या उत्तरेकडील झेदी पंथाच्या शिया मुस्लिम समाजापैकी आहेत. मात्र हा पंथ इराणच्या शिया पंथापेक्षा वेगळा आहे. त्यांचे घोषवाक्य आहे, ” अल्लाह महान आहे,अमेरिका, इस्त्रायलचा मृत्यू अटळ आहे. १९९० च्या दशकात उत्तर येमेनमध्ये गरीब व दुर्लक्षित झालेल्या या समाजाच्या धार्मिक पुनरज्जीवनासाठी चळवळ सुरु करण्यात आली. २००४ ते २०१० या सहा वर्षात त्यांनी येमेन सरकारशी सहा गनिमी युद्धे केली. तर सौदी अरेबियाशीही सीमेवर जोरदार संघर्ष केला. येमेनचे राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्लाह सालेह सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांनी उत्तर येमेनवर आपली पकड मजबूत केली. याच सुमारास अब्दुल मलिक अल हुथी या नेत्याने हजारो तरुणांचा लढाऊ गट उभा केला. २०१४ मध्ये त्यांनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतले. तत्कालीन सरकारला अदेन येथे पलायन करायला लागले. त्यानंतर २०१५ मध्ये सौदी अरेबियाने अरब देशाची आघाडी करून येमेनवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी झालेल्या लढाईत ७७ हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर हुथी समाज इराणच्या अधिक जवळ गेला. इराणच्या ” ऍक्सीस ऑफ रेझीस्टन्स, ” चा ते भाग बनले. यामध्ये हमास, हिजबुल्लाह व हुथी यांचा समावेश आहे. अमेरिकेचा दावा आहे कि इराण त्यांना आधुनिक शस्त्रे, पैसा व प्रशिक्षण देत असतो. पण हुथीचे म्हणणे आहे कि हिजबुल्लाह आम्हाला मदत करतो व शस्त्रे आम्ही स्वतः बनवतो. ऑक्टो. २०२३ मध्ये हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर हुथीनी गाझातील पॅलेस्टिनीच्या समर्थनासाठी लाल समुद्रात आंतरराष्ट्रीय जहाजावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले चढवले. त्यामुळे जगभरातील १५ % व्यापारी जहाजाना आफ्रिकेला वळसा घालुन येजा करावी लागली. इराण – इस्त्रायल युद्धा दरम्यान त्यांनी इस्त्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर इस्त्रायलने येमेनवर १९ वेळा हवाई हल्ले केले. ऑक्टो. २०२५ मध्ये गाझा युद्धविरामनंतर इस्त्रायलने हे हल्ले थांबवले. २०२६ मध्ये हुथीकडे असलेला शस्त्रसाठा संपला होता. तर इराणकडून होणारा शस्त्रपुरवठाही बंद झाला होता. त्यानंतरच्या काळात २८ मार्च २०२६ मध्ये येमेनमधून इस्त्रायलच्या दिशेने पुन्हा क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे इस्त्रायलने जाहीर केले, यामागे इराणचा हात असल्याचा दावा इस्त्रायलने केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात हुथीनी पुन्हा सौदी अरेबीयांची अनेक शहरे व लाल समुद्रातील तेलटँकरवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका इराणवर हल्ले करत असल्यामुळे आम्ही सौदी अरेबियावर हल्ले करत आहोत, असे हुथीचे म्हणणे आहे. हुथीच्या या भूमिकेमुळे हॉर्मुझ सामुद्रधूनी आता पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. हुथी हे खरे तर येमेनचे बंडखोर आहेत. ते थेट इराण – इस्त्रायल यांच्या युद्धात कधीच लढत नाहीत, पण लाल समुद्र बंद करून व इस्त्रायलवर क्षेपणास्त्र टाकून अमेरिका व इस्त्रायलवर मात्र दबाव आणत असतात.

