दीपक मोहिते,
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धक्का ; सकल मराठा समाजाची फारकत,
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची धरसोड वृत्ती व वारंवार भूमिका बदलण्याच्या धोरणामुळे त्यांचे आंदोलन सध्या उतरणीवर लागले आहे. सुरुवातीला ज्या मराठा संघटना त्यांच्या सोबत होत्या, त्यांनी आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून फारकत घेतली आहे. दुसरीकडे नाशिक मधील मराठा समाजाच्या नेत्यांनी काल त्यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. या सर्व घडामोडीमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा अडगळीत पडण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत १९ सप्टें. रोजी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे.
मात्र, त्यांच्या या घोषणेनंतर आंदोलकामध्ये सरळ दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. सकल मराठा समाजाचे नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत टिकेची झोड उठवली आहे. यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मुंबई व वाशीसह प्रत्येक आंदोलनाला मराठवाडा व प. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून बऱ्यापैकी रसद मिळाली होती. जरांगे पाटील हे आपल्या मागण्यामध्ये वारंवार बदल करत असल्यामुळे त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे ? असा संशय सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे. सुरवातीस सरसकट कुणबी प्रमाणपत्राची त्यांची मागणी होती. नंतर सगे सोयरे, पुढे हैद्राबाद, सातारा, कोल्हापूर व औंध गॅझेटची त्यांनी मागणी केली. गॅझेटच्या मदतीने मराठा, कुणबी होऊ शकत नाही. हे लक्षात आल्यानंतर कुणबी समिती बरखास्त करण्याची मागणी पुढे आली. अशा धरसोड वागण्यामुळे व वारंवार भूमिका बदलण्यामुळे मराठा समाजात त्यांच्या आंदोलनविषयी संशय व्यक्त होत आहे.
सतत होणारी आंदोलने, जरांगे यांची होणारी बेमुदत उपोषणे व त्यानंतर मंत्र्याच्या हातून वारंवार सरबत पिणे, अशा घटनामुळे मराठा समाज बिथरला आहे. दरम्यान सकल मराठा समाजाने मुंबईमध्ये १९ सप्टें. रोजी होणाऱ्या आंदोलनापासून अलिप्त राहण्याचे जाहीर केले आहे. वास्तविक जरांगे पाटील यांनी एसइबीसी आरक्षण, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसतिगृह व शिष्यवृत्ती यासारख्या व इतर सवलती व योजनावर त्यांनी भर द्यायला हवा. ते न करता जरांगे पाटील हे केवळ आंदोलने करून समाजाला वेठीस धरत असल्याचा आरोप इतर संघटना करू लागल्या आहेत.

