दीपक मोहिते,
१७ खासदार करणार भाजपात प्रवेश,
भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुरूच आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे. तब्बल १७ खासदार भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारली, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलचा मोठा पराभव झाला. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच तृणमूलमध्ये मोठी फूट पडली. आधी आमदाराच्या गटाने पक्षातून बंडखोरी केली. या आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून विधानसभा अध्यक्षांकडून परवानगी देखील देण्यात आली. त्यानंतर खासदारांच्या गटाने देखील तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी केली, वीस खासदार पक्षातून बाहेर पडले, त्यांनी तृणमूलमधून नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया ( एनएसपीआय ) मध्ये प्रवेश केला. दरम्यान आता एनसीपीआयमध्ये देखील मोठी फूट पडली आहे. तृणमूलमधून बंडखोरी केलेले खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांच्याकडून असा दावा करण्यात आला आहे. येत्या ऑक्टो. महिन्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पक्ष प्रवेशाची तयारी अंतीम टप्प्यात आहे. तृणमूलमधून वीस खासदारांनी बंडखोरी केली होती. त्यांनी एनसीपीआयमध्ये प्रवेश केला. मात्र त्यापैकी आता १७ खासदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा आकडा एक तृतियांशपेक्षा मोठा असल्याने या खासदारांची खासदारकी भाजपमधील पक्ष प्रवेशामुळे धोक्यात येणार नाही. आता हे खासदार लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुढे बोलताना बसुनिया यांनी म्हटलं की, वीस पैकी तीन खासदार हे अल्पसंख्यांक समुदायातून येतात. हे तीन खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत.तर ते भाजपला बाहेरून पाठिंबा देणार आहेत. यामध्ये अबू ताहेर, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण या खासदारांचा समावेश आहे. हे खासदार भाजपमध्ये प्रवेश न करता भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला खिळखिळे करण्याचे भाजपचे स्वप्न अशाप्रकारे पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, ओडिशामध्ये बिजू जनता दल, जम्मू – काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडिपी, इ. प्रादेशिक पक्षाला भाजपने त्यांच्या राज्यातून हद्दपार करण्यात यश मिळवले. २०३५ पर्यंत भाजपला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. त्यांना या कामात बऱ्यापैकी यश मिळत आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीला वेसण घातल्यानंतर त्यांनी आता पंजाब राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. वन नेशन – वन इलेक्शन ही संकल्पना राबवण्याचे भाजपचे धोरण आहे, त्या दिशेने त्यांची पावले पडू लागल्याची ही चिन्हे आहेत.आज महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे दिवसाचे २४ तास गुणगान गात असले तरी येणाऱ्या काळात भाजप त्यांच्या पक्षाचा गळा आवळण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यमान परिस्थिती लक्षात घेता, भविष्यात त्यांनाही आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था भाजपने ” सांगता येत नाही, आणि सहनही होत नाही, ” अशी केली आहे.

