दीपक मोहिते,
परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल,
गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचे सांगण्यात येत आहे. तसा मिटला असेल तर ती आनंदाची बाब आहे. पण हे कर्मचारी वारंवार संप का करतात ? त्यांच्या नेमक्या अडचणी व समस्या काय आहेत ? याचा शोध घेऊन महानगरपालिकेच्या प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
वसई विरार शहर मनपाची ही परिवहन सेवा ठेक्यावर चालवण्यात येते. दशकापूर्वी सुरु करण्यात आलेली ही सेवा सुरवातीपासूनच अडखळत सुरु आहे. कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन, तेही वेळेवर न देणे, विस्कळीत व्यवस्थापन, आगारा अभावी बसेस रस्त्यावर उभ्या करणे, बसेसमधील अस्वच्छता व कर्मचाऱ्याचे वारंवार होणारे संप इ. कारणामुळे ही सेवा अद्याप बाळस धरू शकली नाही. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वेतन न मिळाल्यामुळे बेमुदत संप पुकारला. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात लोकांचे अतोनात हाल झाले. काल संपाच्या पाचव्या दिवशी याविषयी चर्चा होऊन संप मिटल्याचे सांगण्यात येत आहे. पण गेल्या पाच दिवसात नागरिकांचे जे हाल झाले, त्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. काही वर्षांपूर्वी अत्यंत घिसाडघाईने सुरु केलेल्या या महानगरपालिकेने ही सेवा सुरु करून नेमके काय साध्य केले ? असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत. सुरुवातीच्या काळात ठेका घेणारा ठेकेदार महानगरपालिकेच्या जाचाला कंटाळून सोडून गेला. नव्याने ज्या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे, त्याच्या अनागोंदी कारभारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड असंतोष आहे. वेळेवर पगार न देणे, अतिरिक्त कामाचा भत्ता न देणे, असे प्रकार सतत होत असल्यामुळे ही सेवा असून नसल्यासारखी झाली आहे. या महानगरपालिकेत परिवहन समिती नियुक्ती करण्यात येते, मात्र या समितीवर सदस्य म्हणून काम करणाऱ्यांना या विषयाचा बिलकुल गंध नाही. या समितीवर सदस्य म्हणून होणाऱ्या नेमणूकाना केवळ ” राजकीय सोय, ” असा निकष लावण्यात येत असतो. त्यामुळे या सेवेचा गेल्या दहा वर्षात अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. तूर्तास संप मिटला असला तरी तो पुन्हा कधीही सुरु होऊ शकतो. राज्याची एसटी सेवा बंद करून महानगरपालिकेने परिवहन सेवेचा हट्ट कशासाठी केला ? त्यातून नेमके काय साध्य केले, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

