दीपक मोहिते,
वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसांच्या गणपतींच्या मूर्तींचे उत्साहात विसर्जन,
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात काल दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या महानगरपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना यावर्षीही उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी दीड दिवसांच्या एकूण १२ हजार ९८७ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. यामध्ये ११ हजार ९७४ गणेशमूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले, तसेच १ हजार १३ गणेशमूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने सोय केलेल्या जेटी, फिरते हौद व बंद दगडखाणीच्या ठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली.
यंदा मूर्ती विसर्जनासाठी एकूण १२८ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून दोन बंद दगडखाणींच्या ठिकाणी व पाच जेट्टींच्या ठिकाणीही विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात २ फिरते हौद याप्रमाणे मूर्ती विसर्जनासाठी ९ प्रभागांमध्ये १८ फिरते हौद उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, आरती स्थळे, दिवाबत्ती सोय, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, वैद्यकीय मदत कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे इ.आवश्यक सर्व उपाययोजना महानगरपालिकेतर्फे करण्यात आल्या होत्या.
नागरिकांना त्यांच्या जवळील गणेशमूर्ती विसर्जनस्थळाची माहिती तसेच तेथे जाण्याचा मार्ग सहज व त्वरित उपलब्ध व्हावा, यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रत्येक विसर्जन स्थळाचा क्युआर कोडद्वारे ऑनलाइन गुगल लोकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना संबंधित विसर्जन स्थळाचे अचूक स्थान व तेथे जाण्याचा मार्ग त्वरित मिळण्यास मदत झाली. आज पहाटे सहा वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदाही दगडखाणीतील विसर्जनासाठी कन्व्हेअर बेल्टची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली होती. कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने विसर्जन करणे अधिक सोयीस्कर ठरले, वेळेची बचत झाली आणि कमी मनुष्यबळात विसर्जन पार पडले. गणेशभक्तांच्या मदतीसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक तैनात ठेवण्यात आले होते.
सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, अग्निशमन कर्मचारी आणि इतर कर्मचारी वर्ग प्रभागनिहाय विसर्जन स्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनातर्फेही गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवण्यात येत होते.
महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची उभारणी करण्यात आल्यामुळे तसेच विसर्जनस्थळी महानगरपालिकेतर्फे आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना व गणेशभक्तांना बाप्पांचे विसर्जन सुरक्षित, सुलभ व निर्विघ्नपणे करता आले. या सुविधांबद्दल गणेशभक्त व नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महानगरपालिकेने मूर्ती विसर्जनासाठी विविध सोयी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेत नागरिकांकडून महानगरपालिकेला मोठे सहकार्य मिळत आहे. यावर्षीच्या विसर्जनात शाडू मातीच्या मूर्तींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेसाठी व न्यायालय व शासनाच्या सूचनांचे पालन करून येणाऱ्या पाच दिवसीय, गौरी विसर्जन, सात दिवसीय, आणि अनंत चतुर्दशी आदी विसर्जनावेळी नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे आणि निसर्गाची हानी टाळावी,असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २०२६,
कृत्रिम तलाव,
घरगुती – ११,८४७
सार्वजनिक – १२७
एकूण – ११,९७४
जेटी, फिरते हौद व बंद दगडखाणी,
घरगुती – १००९
सार्वजनिक – ४
एकूण – १०१३

