दीपक मोहिते,
कॉक्रोचच्या दणक्याने भाजपचा तरुणाईशी संवाद,
अभिजित दिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीने भाजपची झोप उडवून टाकली आहे. भविष्यात आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या संकटाची चाहूल भाजप व त्यांची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोघांनी तरुणाईशी संवाद साधण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजपासून नागपूरच्या रेशीमबागमध्ये होणाऱ्या या अधिवेशनात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरुण पदाधिकारी झेन-जी पिढीच्या ३० हजार तरुणाशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार देखील तरुणांसाठी नव्या उपक्रम सुरु करण्याच्या तयारीला लागले आहे.” एक दिवस,एक उपक्रम,”असा हा कार्यक्रम असून दररोज एका मंत्र्याने एका विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधयचा आहे.
या भेटीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, आणि देशातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी आखलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. या सर्व घडामोडीमुळे मोदी यांचे सरकार कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतर वर केलेल्या आंदोलनामुळे बॅकफुटवर गेल्याचे दिसून आले आहे. आजवर झालेल्या प्रत्येक आंदोलनात मोदी सरकारची भूमिका कायम ताठर राहिली होती. पण अभिजित दिपके व सोनम वांगचुक या दोघांनी मोदी सरकारला गुडघे टेकायला लावले. ज्या पद्धतीने या दोघांनी आंदोलनाचे नेतृत्व केले,ते नक्कीच वाखाणण्याजोगे होते. संयम,समंजसपणा व जबाबदारी,असा त्रिवेणी संगम त्या आंदोलनात बघायला मिळाला. विद्यार्थ्यांना डावलून चालणार नाही,असा संदेश या आंदोलनातून मोदी सरकारला मिळाला व त्यांचे सरकार तरुणाईशी संवाद साधण्याच्या निर्णयापर्यंत आले आहे. यातून चांगले काहीतरी निष्पन्न होईल,असे आपण समजायला हरकत नाही.या सर्व घडामोडीवरून एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ” दुनिया झुकती है,सिर्फ झुकानेवाला चाहीये, “

