दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आम्ही करदात्यांनी तुमचं काय घोडं मारले ?
वसई तालुक्यात गेल्या वर्षी परिवर्तन झाल्यापासून भाजप व इतर सामाजिक संघटना चांगल्याच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीचा आपण पराभव करू शकतो, असा विश्वास त्यांच्यामध्ये दुणावला व तालुक्यात वेगळे वारे वाहू लागले. यंदा झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला जबरदस्त फटका बसल्यामुळे भाजप व या सामाजिक संघटना अधिक आक्रमक झाल्या.त्यांचे आक्रमक होण्यामुळे बहुजन विकास आघाडीची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत विरोधी पक्षाने विकासाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली. गेली १६ वर्षे या महानगरपालिकेत जाब विचारणारा विरोधी पक्ष नव्हता, त्यामुळे अकरा वर्षे सत्ताधारी व पाच वर्षे ( प्रशासकीय राजवट ) अधिकाऱ्यांनी बेधुंद कारभार केला. पण आज विरोधी पक्षाच्या तोफखान्याला सामोरे जाताना त्यांची चांगलीच त्रेधातीरपिट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे वसई जनशक्ती आघाडी या सामाजिक संघटनेने सत्ताधारी व प्रशासनाला विकासाच्या अनेक प्रश्नावर सळो की पळो करून सोडले आहे. या महानगरपालिकेतील अनेक अधिकारी भ्रष्टाचाराच्या डबक्यात आकंठ बुडाले आहेत. ज्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही,असे अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आल्यामुळे चार महानगरातील विकासाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. सत्ताधारी खोऱ्याने ओरबाडत असतो, मग आपण तरी का मागे राहायचे ? आणि या मानसिकतेमुळे अधिकारी देखील खिसे भरू लागले व करदात्यांच्या घामाच्या पैश्याची लूट झाली. लूट म्हणण्याऐवजी या मंडळींनी महानगरपालिकेच्या तिजोरीची अक्षरश: लूट केली. आज ही महानगरपालिका अपंगावस्थेत असून कशीबशी लंगडत लंगडत तीचा कारभार चालला आहे. पाणी हा विषय संवेदनशील असला तरी सत्ताधारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसा तो वाटत नाही.त्यांना या पाण्यात केवळ ५०० च्या नोटाच दिसतात. वास्तविक सुर्या ही पाणीपुरवठा योजना जेंव्हा पूर्ण झाली तेंव्हाच ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्याची गरज होती. पण तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने ती सत्ताधारी पक्षाकडे सोपवली व वसईकर जनतेच्या पैश्याची धूळधाण झाली. निदान आता तरी विरोधी पक्षाने ही पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे, अन्यथा भविष्यात ही पाणीपुरवठा केवळ बिल्डर लोकांच्या हिताची होऊ शकते. स्वतःला ” पाण्याचे अभ्यासक,” म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांना “आम्हाला मिळणारे पाणी १०० % शुद्धीकरण होत असते का ? असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्याने विचारायला हवा. किंबहुना त्यांनी जेथे पाणी शुद्धीकरण होते, तेथे वारंवार भेटी देऊन पाहणी करावी.

