” दीपक मोहिते,”
” बॉटमलाईन,”
” कारगिल विजय दिन ; भारतीय लष्कराची दैदिप्यमान कामगिरी ,
दरवर्षी संपूर्ण भारतात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या भूभागात घुसखोरी करत आपला भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी करत कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला. सुमारे ८५ दिवसाच्या घनघोर लढाईनंतर भारताने हा परिसर पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले. या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच नालस्ती झाली. भारताच्या तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाकच्या सैन्याची धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना साकडे घातले. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवा,त्यासाठी अमेरीकेला मध्यस्थी करायला लावा. नवाझ शरीफही मुशर्रफ यांच्या या उचापतीमुळे वैतागले होते.आपल्या जवानांचे शिरकाण होऊ नये, म्हणून त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना विनंती केली व तत्कालीन क्लि टन यांनी मध्यस्थी केली व त्यांच्या विनंतीला मान देत भारताने युद्ध थांबवले. लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी आपले सहकारी अधिकारी व दस्तुरखुद्द पंतप्रधान नवाझ शरीफ याना अंधारात ठेवून ही मोहीम आखली होती. पण ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली. पाकची ही कुरापत लक्षात आल्यानंतर आपल्या लष्कराच्या तोफांनी द्रास सेक्टर मधील कारगिलमधील अनेक टेकड्यावर तुफान भडिमार केला.भारत इतक्या वेगाने व प्रभावी कामगिरी करेल, अशी पाकच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनाही कल्पना नव्हती. पण भारतीय सैन्याने अत्यंत वेगाने हल्ले चढवल्यामुळे पाक जवानांची अक्षरशः तारांबळ उडाली. या युद्धात पाकचे ५२७ जवान मारले गेले. अखेर अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केली व २६ जुलै १९९९ रोजी युद्ध थांबले. या युद्धात आपलेही अनेक जवान धारातीर्थी पडले. या युद्धात झालेल्या पराभवाने पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच देशांनी निंदा केली. पाकिस्तानमध्येही मुशर्रफ यांच्या या कृतीविरोधात जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणामुळे पाक लष्करातही तीव्र मतभेद निर्माण झाले होते. मुशरफ यांचा हा निर्णय आत्मघातकी होता, असे सूर उमटले. भारताला कारगिलच्या युद्धात गुंतवून ठेवायचे आणि दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात आघाडी उघडायची,असा डावपेच मुशर्रफ यांनी आखला होता. परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. या युद्धात पाकचे अतोनात नुकसान झाले. भविष्यात आपल्या या निर्णयाची चौकशी नवाझ शरीफ सरकार करेल, अशा भितीमधून मुशर्रफ यांनी नंतर शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली. या त्यांच्या आतताईपणामुळे मुशर्रफ यांनाही कालांतराने पाकिस्तानातून परागंदा व्हावे लागले. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना दुबईमध्ये राहावे लागले. आपल्या जवानांनी मिळवलेल्या या विजयाने पाकला धडा मिळालाच, पण आपले जवान अत्यंत दिलेरीने लढले.

