दीपक मोहीते,
” बॉटमलाईन, ”
आपले सरकार वैचारिक दारिद्राच्या उंबरठ्यावर…
सुशिक्षित, पुरोगामी व वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ अशी जी आपली ओळख होती, ती आता सरकारच्या नाकर्तेपणामुळे हळूहळू नाहीशी होत चालली आहे.
दिवसरात्र श्रीरामाचा जयघोष करणाऱ्यांनी या बदलामध्ये फार मोठी भूमिका पार पाडली आहे. आपल्या देशात शाहू, फुले व आंबेडकर यांना विसरायला लावण्याचे काम सध्या वेगाने सुरु झाले आहे, मात्र ते कदापि शक्य होणार नाही. ज्या शिक्षणमंत्र्यांच्या विभागाने शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला, त्या शिक्षणमंत्र्याला पाठीशी घालणे म्हणजेच वैचारिक दारिद्रपणा होय. प्रभू रामाचा जयघोष करत अभिजित दिपके याच्यावर शाईफेक करणे, हा देखील एकप्रकारे वैचारिक दारिद्रपणाच आहे. तुमचे आमचे पुरोगामी विचार ठेचायचेच, असा उद्देश उराशी बाळगून एक विशिष्ट वर्ग चांगलाच सक्रिय झाला आहे. या वर्गाला संविधान, नागरिकांचे हक्क व अधिकार याचे वावडे आहे. मात्र या वर्गाने जो काही धिंगाणा घातला आहे, त्याला भारतीय जनता कधीही भीक घालणार नाही. ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ मध्ये तत्कालीन सरकारने लोकशाहीचा गळा घोटला, पण भारतीय जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आपले आयुष्य पणाला लावलेल्या सामाजिक कार्यकर्तेव सोनम वांगचूक यांना रामप्रहरी फरफटत नेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करणाऱ्या पोलिसांचा जुलूम पाहिल्यानंतर ही दुसऱ्या आणीबाणीची चाहूल तर नाही ना ? अशा संशयाची पाल तुमच्या आमच्या मनात नक्कीच चूकचूकली असेल. एका रात्रीत पोलीस आयुक्त बदलतो व त्यांचे पथक सकाळी आंदोलनस्थळी धडकते व चादर आडवी धरून सोनम वांगचूक यांची उचलबांगडी होते. हे सारे अघटित व विस्मयजनकच होते. असा प्रकार आणीबाणीच्या काळात देखील आम्ही अनुभवला नव्हता. दिल्ली पोलिसांनी भारतीय संविधानातील कलमे पायदळी तूडवून ही कारवाई केली. या देशात कोणालाही बळजबरीने व त्याच्या मनाविरुद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. पण अलीकडच्या काळात असे गुन्हे पोलिसांकडून वारंवार करण्यात येत असतात. चार वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले, त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचे टायर पंक्चर करण्यासाठी रस्त्यावर चक्क खिळे ठोकले होते, त्याच सरकारचे हे पोलीस सोनम वांगचूक यांच्या बाबतीत तसेच वागले. सरकार कितीजरी मुजोरी करण्याचा प्रयत्न करत असले तरी हे सरकार भयभीत झाले आहे. सोनम वांगचूक यांचे या उपोषण आंदोलनामुळे काही बरे वाईट झाले तर देशभरात आपल्या विरोधात वणवा पेटेल, अशा भितीमुळे सरकारने सोनम वांगचूक यांची उचलबांगडी केली आहे. वास्तविक सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याशी चर्चा करायला हवी होती, पण सरकार आंदोलन ठेचायचा प्रयत्न करत आहे. पंजाबच्या शेतकरी आंदोलनाच्यावेळी देखील सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. पण पंजाबच्या शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. या आंदोलनातही त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते.

