दीपक मोहिते,
सत्ताधारी व विरोधक एकाच माळेचे मणी ; करदाते प्रचंड नाराज,
गेल्या काही दिवसांपासून वसईच्या महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधक हे दोघेही बेधुंदपणे वागत आहेत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे नागरिकांचे भले होईल, असा जर त्यांनी समज करून घेतला असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल.
गेल्या पंधरा वर्षापूर्वी म्हणजे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर विकासाला गती येण्याऐवजी मनपा क्षेत्रातील विरार,नालासोपारा,नवघर – माणिकपूर व वसई या चार महानगराच्या विकासाचा बट्ट्याबोळ झाला. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. करदात्याचा पैसा दिवसाढवळ्या लुटला गेला. त्याविषयी संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानत आहेत. या दोघांना निवडून देऊन करदात्यांवर कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. यापूर्वी विरोध कसा असतो, तो कशाशी खातात, याविषयी माहीती नसलेल्या सत्ताधाऱ्याना आता पावलोपावली होणाऱ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. पूर्वी मनमानी पद्धतीने कामकाज करणाऱ्यांचे विमान सध्या बरेच खाली आले आहे. दुसरीकडे विरोध करताना विरोधी पक्षानेही तारतम्य बाळगले पाहिजे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडताना त्यांनी त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून यायला हवे. अनेकदा त्यांचा सभागृहात फियास्को होत असतो. जे प्रश्न सामंजस्याने सुटू शकतात ते सोडवण्याऐवजी विरोधक सभागृहात गोंधळ घालणे, असा एकमेव कार्यक्रम राबताना पाहायला मिळतात. विषयाचा तिढा सुटत नसेल तर महापौरांच्या दालनात विरोधी पक्ष नेते,सभागृह नेते व अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सोडवणे आवश्यक असते. पण प्रत्येक विषयावर गोंधळ घालणे, चर्चाच होऊ न देणे, असे प्रकार लोकांना मान्य नाहीत. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोघांनी एकमेकांना समजून घेऊन काम केले तर परिसर विकासाला नक्कीच चालना मिळेल, पण आचारसंहिता बासनात गुंडाळून ठेवून तमाशा करण्याची घातक प्रथा राबवण्यात दोन्ही बाजू कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीत. आज या चार महानगरात पाणी, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा व अन्य ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. लोक कर देऊनही मरण यातना भोगत आहेत. पण त्यावर उपाययोजना करण्याऐवजी हे दोघेही एकमेकांच्या उरावर बसत आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी देखील बेफाम झाले आहेत. करदात्यांची कामे वेळेवर होत नाहीत. शेण तर सगळ्यांनी खाल्लं आहे, मग कशासाठी एवढा अट्टाहास ? नागरिकांनी मोठ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिले आहे, त्यांच्या या विश्वासाला पात्र ठरण्याऐवजी हमरीतुमरीवर उतरून सभागृहात गोंधळ घालतो, हे न्यायाला धरून नाही.

