दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
माजी आ.ठाकूर यांच्यासाठी येणारा काळ अत्यंत कठीण,
वसई तालुक्याचे राजकारण २०२४ पासून वेगळ्या वळणावर आले असून,या दोन वर्षांच्या काळात वसईच्या राजकारणात फार मोठ्या उलथापालथी झाल्या. या प्रक्रियेत माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाला ग्रहण लागले. कालपर्यंत राज्याच्या राजकारणात ज्यांच्या शब्दाला मान होता, त्या ठाकुरांना गेल्या दोन वर्षात त्यांचे आप्तस्वकीय व भाजपने चांगलेच खिंडीत पकडले. ही अशी परिस्थिती का निर्माण झाली, यावर ठाकूर यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते. पण ” शेर कभी घास नही खाता,” अशा गुर्मीत राहून त्यांनी गेल्या दोन वर्षात खूप काही गमावले. त्यांच्या सतत अवतीभवती असणाऱ्यांनी त्यांच्या जीवावर खूप काही कमावले. पण,त्यांचे पक्षाच्या जडणघडणीमध्ये योगदान शून्य होते.
त्यामुळे अवतीभवती असलेले स्वार्थी मंडळी व पक्षासाठी सर्वस्व झोकून देणारे प्रामाणिक कार्यकर्ते यांच्यात दरी निर्माण झाली. ही दरी कमी होण्याऐवजी सतत रुंदावत गेली. एक वर्ग गडगंज श्रीमंत होत गेला तर दुसरीकडे पक्षासाठी खस्ता खाणारे कार्यकर्ते मात्र कायम उपेक्षित राहिले. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही ज्यांना जनतेमध्ये काडीची किंमत नाही,अशा प्राधान्य मिळत गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्याचा फटका गेल्या तीन निवडणुकीत ठाकुरांना बसला. लोकसभेच्या निवडणुकीत २००९ चा अपवाद वगळता अन्य चार निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. २००९ साली पक्षाला जो निसटता विजय मिळाला तो मताच्या विभाजनामुळे ,त्यानंतर मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.वास्तविक लोकसभा निवडणुका आपल्या पक्षाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, हे ठाकूर यांच्या लक्षात यायला हवे होते. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदारांच्या मनातील खदखद ओळखता आली नाही. पाणी,आरोग्य व महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार,अशा विविध कारणामुळे जनता पार विटली होती आणि त्यांनी आपला राग ईव्हीएम मशीनमधून व्यक्त केला. ३५ वर्षाच्या त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला. वास्तविक मतदारांनी भाजपला नाईलाज म्हणून स्विकारले. ते चांगले म्हणून लोकांनी त्यांना जवळ केले नाही तर अन्य पर्याय नसल्यामुळे ” दगडापेक्षा वीट बरी,” अशी फुटपट्टी लावत लोकांनी परिवर्तन घडवून आणले. या विजयाने भाजपला संधी उपलब्ध झाली व फोडाफोडीच्या राजकारणाला अक्षरशः उत आला. बहुजन विकास आघाडीतील नाराज मंडळीचा भाजपकडून शोध सुरू झाला व अनेक मासे त्यांच्या गळाला लागले. पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या ठाकुरांना महानगरपालिका निवडणुकीत केवळ ७१ जागा जिंकता आल्या. तर दुसरीकडे भाजपने एका जागेवरून ४४ जागांवर झेप घेतली. हे महाभारत घडल्यानंतरही बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या वागण्यात बदल झाला नाही.” आम्ही महानगरपालिका जिंकली,” अशी शेखी ते मिरवू लागले. वास्तविक भाजपच्या दोन गटात एकवाक्यता असती आणि योग्य उमेदवाराना तिकिटे दिली असती तर आज महानगरपालिकेत वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. तिकीट वाटपाच्या वेळी ” हा आमचा,हा तुमचा,” हा तमाशा झाला नसता तर भाजपला महानगरपालिका जिंकणे सहजशक्य झाले असते. अशा सर्व परिस्थितीत माजी महापौर व ठाकुरांचे आतेभाऊ राजीव पाटील यांच्या तिरक्या चालींना ठाकुरांना तोंड द्यावे लागले. नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या भाच्याला रिंगणात उतरवून बऱ्यापैकी आव्हान उभे केले.त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला, पण वसईकर जनतेमध्ये वेगळे संकेत गेले. ठाकूर यांचे उमेदवार ज्या सहकार पॅनेलमधून निवडणूक लढवत होते,त्या पॅनेलमधील नेत्यांनी निकालानंतर ठाकूर यांना आडवे करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.” राजकारणात कोणी कोणाचे नसते,” हे अजरामर वाक्य ठाकूर कसे विसरले ? हे कळायला मार्ग नाही. हा लेख लिहीत असताना ठाकुरांना आणखी एक झटका बसणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकल्यामुळे वसईकरांच्या भुवया वर गेल्या आहेत.या पोस्टचे शीर्षक होते,” लवकरच टांगा पलटी होणार व घोडे होणार फरार,” असे होते. त्यामुळे लवकरच ” घडलंय बिघडलय,” रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या प्रत्येक सभेत विरोधी पक्षाकडून होणारे एकामागोमाग होणारे हल्ले व उपमहापौराना मिळणारे प्राधान्य लक्षात घेता महापौर अजीव पाटील किती काळ महापौरांच्या खुर्चीत दिसतील, हे सांगता येणार नाही.असो,मात्र या सर्व घडामोडीनंतर ठाकूर यांनी ” आपण जर भाकरी फिरवली नाहीतर आपल्या राजकारणाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे,” हे ओळखायला हवे.

