दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
लोक वर्षभरातच तुम्हाला कंटाळले,
नालासोपारा हे शहर समस्याग्रस्त म्हणून कायम चर्चेत असते. अनधिकृत बांधकामे, वाढती गुन्हेगारी, तीव्र पाणीटंचाई, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व दर पावसाळ्यात निर्माण होणारी पुरपरिस्थिती, अशा कारणामुळे हे शहर बदनाम झाले आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत या शहरातील मतदारांनी परिवर्तन केले. या मतदारांना नव्याने सत्तेत विराजमान झालेल्या लोकप्रतिनिधीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. आपण केलेला बदल, आपल्याला विकासाची वाट दाखवेल, बकाल झालेले आपले शहर कात टाकेल, आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडवेल, अशा त्यांना अपेक्षा होत्या, पण कसले काय ?

अवघ्या वर्षभरात या शहरातील नागरिकांवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली. कारण, विद्यमान लोकप्रतिनिधी हे केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदने देणे, अधिकाऱ्यासोबत पाहणी दौरे करणे, आढावा बैठका घेणे व या सर्व उपक्रमाच्या रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे, या व्यतिरिक्त प्रत्यक्षात एकही विकासकाम मार्गी लावले नाही. अधिकाऱ्यांकडून थोडीफार माहिती मिळाली की त्याठिकाणी भेट देऊन व्हिडियो बनवणे, असा एकमेव कार्यक्रम राबवण्यात त्यांनी धन्यता मानली. वेळप्रसंगी त्यांनी कॅमेऱ्यासमोर रडण्याची नौटंकी देखील केली. त्यामुळे नालासोपारावासीय आता रस्त्यावर उतरून या लोकप्रतिनिधींना थेट हाकलून द्यायला लागले आहेत. आम्ही त्रासात असताना तुम्ही कोणत्या बिळात लपला होतात,असा सवाल करत त्यांनी अनेक नगरसेवकांना सरळ हाकलून दिले. आपल्या प्रभागात आपले मतदार आपल्याला फिरू देत नाहीत, थेट हाकलून देतात ही खऱ्या अर्थाने लाजिरवाणी गोष्ट आहे.
फार मोठ्या अपेक्षेने त्यांनी वर्षभरापूर्वी केलेले परिवर्तन या शहरातील नागरिकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. भाजपकडे या तालुक्यात दमदार, अभ्यासू व आक्रमक नेतृत्व नसल्यामुळे अनेक नगरसेवक सध्या बेफाम झाले आहेत.” परिसर विकास व आपली जबाबदारी, ” याविषयी अनभिज्ञ असल्यामुळे आज त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. केवळ निवेदने देणे, मंत्र्यांच्या भेटी घेणे, हे सोपस्कार जनतेला मान्य नाहीत. आजवर अनेक निवेदने देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी प्रचंड निधी दिला, अशा बातम्या गेले वर्षभर ऐकत आलो. पण प्रत्यक्षात किती निधी मिळाला व किती विकासकामे सुरु झाली, हे मात्र कायम गुलदस्त्यातच राहीले. आज लोक आपल्याला हाकलून द्यायला लागले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत ते काय करतील ? याचा विचार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा. अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आहे.

