दिपक मोहिते,
” फ्रंटलाईन, ”
यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
गेल्या चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या कोसळत असलेला पाऊस आणखी आठ ते दहा दिवस असाच सुरू राहिला तर जिल्ह्यातील भातशेती यंदा चांगलीच बहरु शकते,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सतत घटत असताना यंदाचा मान्सून कृषीक्षेत्रासाठी दिलासा देणारा आहे
पालघर जिल्हा हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील ७० टक्के जनतेचा भातशेती हा मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ( ४ लाख ७० हजार हे. ) सुमारे ३ लाख ६० हजार हे.जमीन लागवडीखाली आहे. त्यामध्ये भात व नाचणी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. ही दोन्ही पिके प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.केवळ २० हजार हे. क्षेत्र हे कालवे, नद्या व इतर जलस्रोताद्वारे सिंचनाखाली येते. या व्यतिरिक्त केळी, चिकू व आंबा,या फळांचीही लागवड करण्यात येत असते.जिल्ह्यातील ७१ % कुटुंबे हे शेती व जोडधंद्यावर अवलंबून आहेत.जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात भाताचे उत्पादन घेण्यात येते, याव्यतिरिक्त जव्हार,मोखाडा व विक्रमगड तालुक्यात नाचणी व वरईची लागवड करण्यात येते.
सध्या पडत असलेला पाऊस जिल्ह्यातील कृषिक्षेत्राला दिलासा मिळवून देणारा असला तरी त्यामध्ये खंड पडता कामा नये. कारण गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पालघर जिल्ह्यात पावसाचे उशिराने होणारे आगमन,मध्येच पावसाचे गायब होणे,अवकाळी पाऊस व परतीच्या पावसाचा बसणारा फटका,आदी कारणामुळे जिल्ह्याच्या धान्यउत्पादनावर त्याचा चांगलाच परिणाम जाणवला. त्यामुळे यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे साकडे ते वरुणराजाला घालत आहेत. पावसाचे आगमन उशिराने झाले असले तरी यंदाचा पाऊस व भातशेतीला आवश्यक असलेले हवामान हे कृषिक्षेत्राला नवसंजीवनी देणारे आहे.

