दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
पत्रकारांना धमकावणे, त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलणे, त्यांना मारहाण करणे व वेळप्रसंगी त्यांना जगातूनच नाहीसे करणे, असे प्रकार सध्या वाढीला लागले आहेत. चार दिवसांपूर्वी ईशान्य मुंबईचे खा. संजय दीना पाटील,यांनी पत्रकारांना जी काही वागणूक दिली ती राजकारणात गुंड प्रवृत्तीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे, हेच अधोरेखीत करणारे आहे.” माझ्या *** बोट घालू नका,” असे धमकी देणारा हा आपला खासदार आहे,आणि आपण त्याला निवडून दिले आहे,याची खर तर ईशान्य मुंबईच्या मतदारांना नक्कीच लाज वाटली असावी. आज हे खासदार हात जोडून माफी मागत फिरत आहेत. मी चुकून बोललो, मला माफ करा, अशी आर्जवे करत फिरत आहेत. त्यांना ही उपरती केंव्हा झाली तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कान उपटल्यानंतर..
हात जोडून माफी मागताना, ते माझ्या कुटुंबावर टीका केली म्हणून माझा तोल गेल्याचे सांगत सुटले आहेत. कोणाच्याही कूटुंबावर भाष्य करणे किंवा टीका करणे, याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. पण,हे सांगताना संजय दीना पाटील यांनी १९७० ते १९८० च्या दशकात ते जेथे राहतात, त्या भांडुपच्या इतिहासात डोकावून पाहिले असते तर बरं झालं असते. त्यावेळी भांडुपमध्ये ” वरच्या भागात थापा व खालच्या भागात दीना,” ही जी घोषणा आसमंतात गर्जत होती, तो काळ आम्हाला आजही आठवतो. कदाचित त्यावेळी तरुणावस्थेत असलेले संजय दीना पाटील हे देखील त्याचे साक्षीदार होते. असो,इतिहास कितीही उगळला तरी तो काळाच निघतो. पण पत्रकारांना तुच्छ लेखायचं, हा राजकारणी लोकांचा स्थायी स्वभाव व एकप्रकारचा धंदा बनला आहे. याला आपण पत्रकार मंडळीच जबाबदार आहोत. जाहिराती व मूठभर पैसे,यासाठी काही पत्रकारांनी टिळक,आंबेडकर व जांभेकराना अपेक्षित असलेली पत्रकारिता, ही अपप्रवृत्तीच्या लोकांच्या दावणीला बांधली. याविषयी मला देखील दोन वर्षांपूर्वी असाच अनुभव आला होता, एकाने मलाही अशीच धमकी दिली होती,” आम्ही गुंडच आहोत, जेलमध्ये गेलो तरी काही फरक पडत नाही,” पण,मी त्याच्या या धमकीवजा बोलण्याला भीक घातले नाही व त्याकडे दुर्लक्ष केले. मी खूप काही करू शकलो असतो, कारण या महाशयांनी किती अनधिकृत कामे केली आहेत, किती सातबारे फिरवले आहेत, किती गुरचरण जमिनी स्वतःच्या घशात घातल्या आहेत, याप्रकरणी खूप काही करू शकलो असतो. पण ” एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये,” या हिंदू संस्कृतीमधील संस्कारापोटी मी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे सारे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत,हे आपण समजून घेतले पाहिजे. ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्याला आपले पत्रकारच जबाबदार आहेत. एखाद्या नेत्याच्या विरोधात पत्रकाराने बातमी छापली की आपले पत्रकार, त्याच दिवशी त्या नेत्याला गाठतात व ” तुमच्या विरोधात अमुक अमुक पत्रकाराने बघा काय छापलय ते,” असे सांगण्यात धन्यता मानतात. हा एकप्रकारे लाळघोटेपणा असतो. पण वाढदिवसाला मिळणाऱ्या जाहिरातीमुळे या पत्रकारांना असे लोटांगण घालावे लागते. काही वर्षांपूर्वी मी दोन मोठ्या दैनिकांत काम करत असताना दैनिकाचा प्रमुख म्हणून काम करताना माझ्यावर मॅनेजमेंटकडून जाहिरातीचे प्रचंड प्रेशर असायचे, मी काही काळ जाहिरातीचे काम केले देखील, पण स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून हाजी हाजी करणे,मला जमत नव्हते, किंवा लाचारी करणे, माझ्या मनाला पटत नव्हते. मी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. त्यानंतर हल्लीच म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मला एक कॉल आला होता, समोरच्या व्यक्तीने मला विचारले की तुम्ही माझ्यावर नाराज आहात का ? हल्ली विरोधात बातम्या लागतात. काही पत्रकारांनी मला कॉल करून सांगितले की मोहिते, राजकीय नेत्यांच्या विरोधात हल्ली खूप काही लिहीत आहेत. मी त्या नेत्याला प्रतिप्रश्न केला की ज्या कोणी पत्रकाराने तुम्हाला येऊन सांगितले, त्याला तुम्ही विचारायला हवं होतं की ते सर्वांच्या चांगल्या बातम्या करतात, तेव्हा तू सांगायला का येत नाहीस ? मी त्या नेत्याला आणखी एक महत्वाची बाब सांगितली,एकवेळ तुम्ही राजकारणी लोक एकत्र याल, पण आम्ही पत्रकार कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. हे वास्तव ज्याला कळले, तो कधीही टोळीची पत्रकारिता करणार नाही. आज संजय दीना पाटील सारखे राजकारणी ऑन स्क्रीन पत्रकारांविरुद्ध गरळ ओकतात,त्याला काही अंशी आम्ही पत्रकारच जबाबदार आहेत.

