दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही,”
ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेच्या निवडणुकीवरून वसई विरार भागातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे ती आता चुरशीची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही बँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपने गेल्या तीन दिवसांपासून विविध हातखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा, बोईसर व विक्रमगड या चार विधानसभा जिंकून भाजपने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर झालेल्या वसई- विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत ४४ जागा जिंकून बविआची चांगलीच दमछाक केली. आज या महानगरपालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेता व सभागृह नेता, हे दोघेही सत्ताधारी पक्षाच्या कारभाराविरोधात यशस्वीपणे मोहीम चालवत आहेत. गेल्या निवडणुकीत या महानगरपालिकेत विरोधी पक्ष औषधालाही नव्हता,त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले होते.पण गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थ विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला व दररोज भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली. बँकेच्या निवडणुकीत भाजपने जर बाजी मारली तर येणाऱ्या काळात या महानगरपालिकेत कमळ फुलण्याची शक्यता आहे. विद्यमान महापौर अजीव पाटील यांना डावलून उपमहापौर मार्शल लोपीस यांना सध्या मोठ्याप्रमाणात महत्व देण्यात येत आहे. दर दिवशी सोशल मीडियावर त्यांचे आठ ते दहा रिल्स पाहायला मिळतात.उपमहापौराना मोठे करण्यासाठी कोणत्या शक्ती सक्रिय झाल्या आहेत,याची चर्चा महानगरपालिकेच्या आवारात सतत होत आहे.उपमहापौराच्या दालनात अभ्यागतांची तोबा गर्दी पाहायला मिळते, तर दुसरीकडे महापौरांचे दालन मात्र सुने सुने असते.असा हा बदल,खूप काही सांगून जातो. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीनंतर खूप काही घडण्याची शक्यता आहे.सध्या भाजपला सर्वोतोपरी मदत करणाऱ्या नेत्याने निर्णय घेतला तर वसईच्या राजकारणात खूप काही उलथापालथी होऊ शकतात. चार दिवसांपूर्वी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यावर परखड टीका केली होती. तेंव्हा हार्दिक राऊत यांचे मामा असलेल्या महापौरांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.” सांगता येत नाही आणि सहनही होत नाही,” असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. त्यामुळे बँकेच्या या निवडणुकीनंतर नक्की काय होणार ? याकडे तमाम वसई विरारकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

