दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
२५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा,
५१ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कार करणारा, मानवी हक्क व अधिकार यास सर्वोच्च प्राधान्य देणारा देश म्हणून जगभरात ओळख असलेल्या भारतात या दिवशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. सुमारे २१ महिने आपला देश अंधारात चाचपडत होता. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण सांगून इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने देशव्यापी आणीबाणीची शिफारस केली. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम ३५२ (१) नुसार देशभरात आणीबाणी जारी केली.
पण लोकशाही व्यवस्थेवर दृढविश्वास असणाऱ्या भारतीय जनतेने या आणीबाणीला कडाडून विरोध केला.सरकारने संपूर्ण देशाचा तुरुंग केला. वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी झाली. माध्यमांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली.देशात सर्वत्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सरकारने प्रत्येक आघाडीवर दडपशाही करण्याचे सत्र आरंभले. सन १९७१ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस सरकारला प्रचंड विरोध सुरू झाला होता. या निवडणुकीत जनसंघ,समाजवादी व संघटना काँग्रेस,या तिघांनी काँग्रेसच्या विरोधात एकत्रित मोट बांधली होती. या आघाडीला यश मिळेल व काँग्रेस भुईसपाट होईल,असा अंदाज होता. पण बँकांचे राष्ट्रीयीकरण,गरीबी हटावचा नारा व आंतरराष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी, या शिदोरीवर इंदिरा काँग्रेसने निवडणुका एकहाती जिंकल्या. एकूण ५१८ जागांपैकी ३५२ जागा जिंकून काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीला चारीमुंड्या चित केले. त्याच सुमारास झालेल्या विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसनेच बाजी मारली.
त्यानंतर मात्र इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. विरोधकांची होणारी एकजूट लक्षात घेऊन काँग्रेसने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याची हाकाटी सुरू केली व देशावर आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला. आणीबाणी जाहीर केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी लोकशाही व्यवस्था स्थगित करून सर्वाधिकार आपल्या हाती घेतले आणि निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. या काळात राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना गजाआड करण्यात आले. प्रसारमाध्यमावर बंधने लादण्यात आली. पण लोकांनी या जुलूमशाहीला कडाडून विरोध केला.सुमारे २१ महिने देशात आणीबाणीचा अंमल राहिला. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवली. स्वातंत्र्याच्या ३० वर्षानंतर मोरारजी देसाई हे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान बनले. या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनाही त्यांच्या पारंपरिक रायबरेली लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला.समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस,अटलबिहारी वाजपेयी,जयप्रकाश नारायण,मृणाल गोरे,सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या लढ्यात मोठे योगदान दिले. एक्प्रेस समूहाचे सर्वेसर्वा रामनाथ गोयंका,हे इंदिरा गांधीं विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांनी आणीबाणी लागू होताच पहिल्याच दिवशी आपल्या दैनिकाच्या अग्रलेखाचा कॉलम रिकामा ठेवून आपला निषेध व्यक्त केला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या निषेधांमुळे लढ्याला बळ मिळाले व देशभरात सरकारविरोधात वातावरण निर्माण झाले.उद्या या घटनेला ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या कटू आठवणीचे विस्मरण होणे, कठीण आहे. कारण अठरापगड जाती-धर्माचा समावेश असलेल्या आपल्या देशात जुलूमशाहीला लोक कधीही थारा देत नाहीत. भारतीय जनता सोशिक आहे, मात्र अन्याय झाला की ते पेटून उठतात व संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत जुलूम करणारी सत्ता उलथवून टाकतात.हीच आपल्या संविधानाची हीच खरी ताकद आहे.

