दीपक मोहिते,
“हल्लाबोल,” ( उत्तरार्ध )
ठाकुर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
काल प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखात ” ठाकुरको आखिर गुस्सा क्यों आया ? ” सदराखाली मी सविस्तर विवेचन केले होते. आजच्या भागात माजी आ. हितेंद्र ठाकूर यांचा संयम का सुटला ? आणि त्यामागची नेमकी काय कारणे आहेत ? यावर प्रकाश टाकणार आहे.
भाजपच्या परिवर्तन पॅनल )मधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत हे कधीच स्वयंप्रकाशित असे व्यक्तिमत्व नव्हते व आजही नाही. नगरसेवक म्हणून त्यांची कारकिर्दही फारशी चर्चेत राहिली नाही.” दोन मामांचे वलय,” असलेला नवखा तरुण, अशी त्यांची ओळख होती व आजही ती तशीच आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा भाजपच्या नवख्या उमेदवाराकडून पराभव झाला. पराभव का झाला ? हा एक वेगळा विषय आहे. माजी आ.ठाकूर यांचा त्यांच्या विषयी इतका पारा का चढावा ? राजकारणात नवखा असलेल्या हार्दिक राऊत यांची दखल त्यांना का घ्यावी लागली ? या प्रश्नाचे उत्तर मी शोधायच प्रयत्न केला. तर हार्दिक राऊत हे केवळ बुद्धिबळाच्या पटावरील एक प्यादे असून ही चाल चालणारा खरा वजीर वेगळाच आहे. हा वजीर आज ना उद्या नक्की समोर येण्याची शक्यता आहे. आज हार्दिक राऊत यांना निवडून आणण्यासाठी या वजीरासोबत भाजपचे धुरंदर नेतेही प्रचंड मेहनत घेत आहेत. या निवडणुकीत धनशक्तीचाही प्रचंड प्रमाणात उलाढाल सुरू झाला आहे. त्यामुळे माजी आ.ठाकूर यांचा संयम सुटला. वास्तविक हार्दिक राऊत यांच्यासारख्या लहान कार्यकर्त्याची दखल घेणे, म्हणजे त्यांना मोठे करण्यासारखे होते. आज हार्दिक राऊत हे ठाणे – पालघर जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहेत. गेल्या ३५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत विरोधकांच्या टीकेला कधीही प्रत्युत्तर न देणारे ठाकूर यांचा अशाप्रकारे संयम सुटणे, कोणाच्याही मनाला पटणारे नाही. आ.विलास तरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी बविआला रामराम ठोकला, तेंव्हा पत्रकारांनी ठाकूर याना छेडले. त्यावेळी माजी आ.ठाकूर यांनी ” देव त्यांचे भले करो,” अशी साधी प्रतिक्रिया दिली होती. आज तेच ठाकूर आपल्या भाषणात आदळाआपट करताना पाहायला मिळाले. त्याला कारणीभूत आहे, हार्दिक राऊत यांच्या मागे असलेला वजीर होय. या लढाईत जर हार्दिक राऊत यांनी बाजी मारली, तर मात्र ठाकूर यांना अवघ्या दोन वर्षात दुसऱ्यांदा सेटबॅक बसणार आहे. तसेच या निवडणुकीच्या निकालानंतर जर पारडे भाजपच्या बाजूने झुकले तर वसई तालुक्यात आ.ठाकूर यांच्यासमोर पर्याय उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे कपिल पाटील,गणेश नाईक व सध्या अदृश्य असलेला वजीर जोरात कामाला लागले आहेत.

