दीपक मोहिते,
रणसंग्राम,
ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व,
बहुचर्चित ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या सहकार पॅनेलने २१ पैकी १६ जागा जिंकून बँकेवर झेंडा फडकवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची अशी झाली.
निवडणुक होण्यापूर्वी शिंदे गटाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १३ जागासाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. पहिले दोन निकाल हे परिवर्तन पॅनलच्या बाजूने लागले. त्यांच्या पॅनेलचे अनिल गावड व ज्योती दिलीप पटेकर तर जिजाऊचे निलेश सांबरे हे विजयी झाले. त्यानंतर मात्र सहकार पॅनेलने मुसंडी मारत उर्वरित सर्व जागा जिंकल्या. या निवडणुकीचे विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व वसई विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर अजीव पाटील यांचे भाचे हार्दिक राऊत यांना मात्र पराभव चाखावा लागला. ते भाजप प्रणित परिवर्तन पॅनेलमधून उभे होते. त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवल्यामुळे माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी प्रचारा दरम्यान त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली होती. त्यांचा पराभव करण्यासाठी दस्तुरखुद्द ठाकूर मैदानात उतरले होते. तर दुसरीकडे राऊत यांचा पराभव करणे शक्य होऊ नये, यासाठी भाजपची सारी यंत्रणा कामाला लागली होती. पण सहकार पॅनेलने १६ जागा जिंकत बँकेवर आपले निर्विवाद वर्चस्व राखले. या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे मात्र पार बदलून गेली आहेत. मुरबाडचे आ.किसन कथोरे हे मूळचे भाजपचे, पण त्यांनी या निवडणुकीत एकेकाळचे आपले कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. दुसरीकडे माजी आ.ठाकूर व शिंदे हे देखील एकमेकांचे कट्टर विरोधक, तेही या निवडणुकीत एकत्र आले. सत्ता मिळवण्यासाठी पूर्वीची मानापमानाची नाटके गिळून हे सगळे या निवडणुकीत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले व त्यांनी भाजपला चारीमुंड्या चित केले. भविष्यात फोडाफोडीचे राजकारण झाल्यास बँकेच्या सभासदांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निकालाच्या दिवशीच तसे संकेत दिले आहेत. शेवटी सत्ता मिळवणे, हेच या मंडळींचे अंतिम लक्ष्य असते.त्यामुळे येणाऱ्या काळात काहीही घडू शकते.

