दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो ….
एकेकाळी गौतम बुद्ध, सम्राट अशोक व शंकराचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक शुर्पारक नगरीला आज अक्षरशः बकाल स्वरूप आले आहे. सरकार दरबारी केवळ प्रश्न उपस्थित करणे, सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणे आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहून मगरीचे अश्रू ढाळण्याने लोकांची सहानुभूती मिळत नाही, तर लोक आपल्या दारातून हाकलून देतात.अवघ्या एका वर्षात आपल्यावर अशी वेळ का आली, याविषयी लोकप्रतिनिधीने आत्मपरीक्षण केले पाहिजे.
नालासोपारावासीयांनी गेल्या वर्षी, अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना बाजूला सारत नव्यांना संधी दिली. त्याबदल्यात त्यांच्या पदरात काय पडले,तर अतोनात त्रास, रोजचे मरण, अवहेलना व उपेक्षा होय… सोपारा हे एकेकाळी नावाजलेले बंदर होते, या बंदरातून प्रचंड व्यापार होत असे, कालांतराने हे बंदर इतिहास जमा झाले.बौद्ध स्तूप,शंकराचार्य मंदिर व अन्य ऐतिहासिक स्थळे याच शहरात आहेत.या स्थळांना भेटी देणाऱ्या महान विभूतीच्या नावाची यादी न्याहाळली तर आपण तोंडात बोटे घालू. आज या ऐतिहासिक नगरीतील जनता पाणी,आरोग्य व अन्य पायाभूत सोयी – सुविधांसाठी जीवन मरणाची लढाई लढत आहे.” परिवर्तन करून आम्हीच स्वतःला दुःखाच्या खाईत ढकलले आहे, होते तेच बरे होते,असे म्हणायची पाळी आमच्यावर आली आहे, अशी खंत नालासोपारावासीय व्यक्त करत असतात.आज आमची अवस्था ” आगीतून फुफाट्यात,” पडल्यासारखी झाली आहे.प्यायला पाणी नाही,चालायला धड रस्ते नाही,कायदा व सुव्यवस्थेची दुरावस्था,अशा विविध कारणामुळे हे शहर ऐतिहासिक नव्हे तर अश्मयुगीन काळातील बरबटलेले शहर म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आज स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत.आपल्या शहराची दुरावस्था झाली असताना हे तथाकथित नेते केरलम राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या राज्यात दाखल झाले होते.तेथे जाऊन त्यांनी काय दिवे लावले देवजाणे …मात्र सोशल मीडियावर बऱ्याच रिल्स पाहायला मिळाल्या. निकालानंतर आम्ही प्रचार केल्यामुळे आमची एकमेव सीट आली म्हणून निकालानंतर स्वतःच्या उर बडवणाऱ्या रिल्सचेही सोशल मीडियावर पीक आले.असो,हा त्यांच्या पक्षाचा मामला आहे.पण आपल्या शहराचे आरोग्य सांभाळता येत नसताना,हे सारे उपद्व्याप कशासाठी ? असा प्रश्न शहरातील मतदारांनी त्यांना विचारायला हवा. ज्या सम्राट अशोक,गौतम बुद्ध व शंकराचार्य यांनी या शहराला भेटी दिल्या,त्यांना काय वाटत असेल ? याची कल्पना देखील करवत नाही. या लोकांनी एक लक्षात ठेवावे, कारभार सुधारा, नौटंकी बंद करा, रडणे बंद करा,आणि लोकांची कामे करा,अन्यथा जे मतदार ३० वर्षे सत्तेत असलेल्याना एका फटक्यात घरी बसवू शकतात,ते मतदार आगामी निवडणुकीत तुमचं काय करतील ? याची कल्पना न केलेलीच बरी.” मी ज्या नालासोपारा शहरातून येतो,” हे वाक्य उच्चारताना आपल्या शहराचे दारुण वास्तव नजरेसमोर आणत चला..एवढीच नालासोपरावासियांची इच्छा आहे.

