दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१८,
प्रभाग क्र.१८ हा सर्वात गलिच्छ प्रभाग,प्रचंड प्रमाणात अनधिकृत चाळींचे सुळसुळाट,
या प्रभागात केवळ आणि केवळ अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट असल्याचे पाहायला मिळते.हे जे अनधिकृत बांधकामाचे अमाप पीक आले आहे,त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींची ” अर्थपूर्ण निष्क्रियता,” जबाबदार आहे.या अशा प्रभागात स्थानिक भूमिपुत्र अल्पसंख्यांक होत गेला तर मुस्लिम व उत्तर भारतीय समाज बहुसंख्यांक झाला आहे.या लोकांनी वन,आरक्षित जमिनीवर सरसकट अनधिकृत चाळी उभारण्यात आल्या.त्यामुळे प्रभागाला बकाल स्वरूप आले आहे.रस्ते व गटारे नसताना चाळमाफियांनी सरसकट चाळी बांधल्या.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अनधिकृत बांधकामांना वीज व पाणी या दोन्ही नागरी सुविधा उपलब्ध होत गेल्या.यावरून या महानगरपालिका व महावितरण विभागात भ्रष्टाचाराची पाळमुळे किती खोलवर रुजली आहेत,हे आपल्या लक्षात येते.एकूण २९ प्रभागांपैकी सर्वात जास्त गलिच्छ प्रभाग म्हणून हा प्रभाग ओळखला जातो.
अस्वच्छतेची स्पर्धा आयोजित करण्यात आली तर हा प्रभाग नक्कीच प्रथम क्रमांक पटकावेल,अशी परिस्थिती या प्रभागाची झाल्याचे पाहायला मिळते.गल्लीबोळ व मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग व कचरा चिवडणारी भटकी कुत्री,असे चित्र नेहमीच पाहायला मिळते.रस्त्याची साफसफाई व औषध फवारणीचा थांगपत्ता नसतो.पण सफाईचे ठेकेदार मात्र दरवर्षी मालामाल होत असतात.या पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर किमान तीन ते चार दिवस पाण्यात होता.लोकांचे हाल कुत्रे खात नव्हते,आपत्कालीन यंत्रणा गायब होती.त्यामुळे लोकांना मोठ्याप्रमाणात हालअपेष्टा भोगाव्या लागल्या.नालेसफाई हा प्रकार येथील नागरिकांना कधीच अनुभवायला मिळाला नाही.अशा या प्रभागाची लोकसंख्या ४३ हजार ९७ इतकी आहे.अनु.जाती व अनु.जमातीची लोकसंख्या पंधराशेच्या घरात आहे.गेल्या पंधरा वर्षात या प्रभागात फारशी विकासकामे झाली नाहीत.कारण येथील सर्व बांधकामे अनधिकृत आहेत.त्यामुळे रस्ते,गटारे व अन्य नागरी सुविधा देणे,महानगरपालिका प्रशासनाला शक्य होत नाही.पण या बांधकामांना वीज व पाणी कसे मिळते ? हे कोडे काही सुटता सुटत नाही.या प्रभागात जीवन नगर,दुर्गा नगर,संतोष भुवन,बावशेत पाडा,हंसविजयनगर,हवाईपाडा,गवराईपाडा,बिलालपडा,गवराईपाडा औद्योगिक वसाहत,कारगिलनगर व खैरपाडा,या नागरी व औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे.या प्रभागावर गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे.त्याला आव्हान देण्यासाठी भाजपच्या युवा वर्गाने कंबर कसली आहे.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये भाजपच्या तरुणांनी केलेल्या मदत कार्याचा आगामी निवडणुकीमध्ये भाजपला चांगलाच फायदा होऊ शकतो.

